जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात लॉकडाऊनमुळे एका बाजूला भाजीपाला पिकवलेला शेतकरी अडचणीत आला तर दुसऱ्या बाजूला भाजीपाला मिळत नसल्याने जतकरांना सकस आहार मिळणे अवघड झाले. मागील वर्षी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील 22 हजार कुटूंबियांना घरपोच भाजीपाला वाटप केला होता. यावर्षी पुन्हा तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात दररोज चार टन घरपोच भाजीपाला वाटप सुरू केला आहे.
तुकाराम बाबा महाराज यांनी मागील वर्षी कोरोनाच्या काळात जतकरांसाठी मोठे योगदान दिले होते.
यंदाही कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले. तुकाराम बाबांनी हेच हेरून श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने घरपोच भाजीपाला वाटप सुरू करण्याचे नियोजन आखले त्यानुसार बाबांनी स्वतः भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भाजीपाला खरेदी केला व अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शासनाचे सर्व नियम पाळत तालुक्यात घरपोच भाजीपाला वाटप सुरू केला आहे.
जत पूर्व भागातील जाडरबोबलाद, सोन्याळलकडेवाडी, बंडगरवाडी, घारळेवाडी, कोणबगी, मोटेवाडी, को.बोबलाद, करेवाडी, गुलगुंजनाळ, लवंगा या गावात दोन दिवसात भाजीपाला वाटप केले आहे. उर्वरित गावातही भाजीपाला वाटप करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला आहे त्यांनीही संपर्क साधावा असे आवाहन यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे. यावेळी दत्ता सावळे, नागनाथ भिसे, सिद्राय्या मोरे, आभास नदाफ, शहारुख देशिंग,ज्योती हारगे आदी उपस्थित होते.
जत तालुक्यातील गावागावात तुकाराम बाबांनी भाजीपाल्याचे वाटप सुरू केले आहे.







