जत,संकेत टाइम्स : खैराव (ता.जत)येथे गॅसचा स्फोट होवून दीपक बाळू ढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी तातडीने खैराव येथे भेट देऊन ढगे कुटूंबियांना धीर देत,आर्थिक मदत केली.
खैराव येथे दीपक ढगे यांची वस्ती आहे. पत्र्याचे घर आहे.शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला या गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला व काही कळायच्या आत गॅसचा स्फोट झाला.या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले. या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख एक लाख 75 हजार रुपये, तीन तोळे सोने, दीड ते दोन लाखाचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या दुर्घटनेत ढगे कुटूंब उघड्यावर आले आहे.या घटनेची माहिती मिळताच कर्नाटक येथे निघालेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी खैराव गाठले. ढगे कुटूंबियांना बाबांनी धीर देत त्यांना मदतीचा हात दिला. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.घटना घडल्यानंतर अर्धा तासातच बाबा खैरावमष्ये दाखल झाले व त्यांनी ढगे कुटूंबियांना मदत केली. यावेळी खैरावचे सरपंच राजाराम घुटूकडे, पोलीस पाटील कांताबाई पाटील, भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते.
जत तालुक्यात गॅस स्फोट व जळीतग्रस्त्यांच्या घटनेत वाढ होत आहे, ही बाब चिंताजनक आहे. तालुक्यातील मोटेवाडी, उटगी, कागनरी, तिकोंडी, उमराणी, येळदरी, काराजनगी, आसंगी तुर्क, प्रतापूर, पांडोझरी आदी गावात जेथे आशा घटना घडल्या आहेत तेथे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत करण्यात आली आहे. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांना केले आहे.
स्फोट झाल्यानंतर घराचे नुकसान, गँस टाकी फुटली आहे.









