सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून त्यानंतर कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना जलसंधारण व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात पुढील दोन आठवडे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनानक आवश्यक कार्यवाही करावी. आठवडी बाजारांवर निर्बंध आणताना जनतेच्या सोयीचाही विचार व्हावा. जनतेला भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची कमतरता भासू नये याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे.
जयंत पाटील यांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत असताना जिल्ह्यात 1 हजार 3 रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी 181 रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर 822 रूग्ण गृहअलगीकरणामध्ये आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हॉस्पीटलमध्ये कोरोना अनुषंगीक उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या काळात आणखी रूग्णांना हॉस्पीटलायझेशनची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेवून शासकीय रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्येही कोरोना विषयक उपचारांची आवश्यक तजवीज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच रूग्णांनीही ताप, कणकण यासारखे दुखणे अंगावर न काढता लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत व पुढील धोका टाळावा.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य यंत्रणेने आपली सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी. पुरेशा बेड्सची संख्या, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा सज्ज ठेवाव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये टेस्टींगची संख्याही वाढवावी, अशा सूचना कोरोना आढावा बैठकीत दिल्या.








