जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाने बाह्यरुग्ण विभाग दोन वेळेस सुरू ठेवावेत असे आदेश काढूनही जत तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालये,व 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी एक वेळच बाह्यरूग्ण विभाग ठेवण्यात येत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 8.30 ते 12.30 व सायकांळी 4.00 ते 6.00 असे दोन वेळा बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवावेत,अन्यथा आंदोलन करू,असा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे.
ढोणे यांनी माडग्याळ व जत ग्रामीण रुग्णालयास भेट दिली,त्यावेळी दोन्ही रुग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग कुलूप बंद होता.जत ग्रामीण रुग्णालयात औषध विभागही कुलूपबंद होता.शासनाने दोन वेळा बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवण्याचे परिपत्रक दोन महिन्यापुर्वी काढले आहे,असे असतानाही जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वेळ बदलत नाही,येथील कर्मचाऱ्यांची अनेक वर्षे पाटलाच्या मळ्यात काम केल्यासारखी परिस्थिती आहे.
ग्रामीण रुग्णालया पेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था वाईट आहे.केंद्रात अपवाद वगळता मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात,दुय्यम अधिकाऱ्यांवर कारभार सुरू आहे.त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे नेमके निदान होत नाही,परिणामी खाजगीचा आधार घ्यावा लागत आहे, कोरोनाचे दुसऱ्या वेळी रुग्ण वाढत असतानाही हलगर्जी पणा धोकादायक आहे,यात सुधारणा करावी,असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.








