जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात दुष्काळ,निसर्गाची अवकृपा झेलत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकवली,मात्र त्याचे व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने पुन्हा खर्चिक असतानाही बेदाणा निर्मिती केली आहे. मात्र सांगली बाजार समितीत बेदाण्याला कवडीमोल दर मिळत असल्याच्या निषेधार्थ जतचे नेते जिल्हा परिषद सदस्य तम्मणगोडा पाटील,संजयकुमार तेली व लक्ष्मण जखगोंड यांनी बाजार समितीत ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी,सभापती दिनकर पाटील यांना निवेदन दिले.
द्राक्ष बागायतदार शेतकरी टँकरने पाणी घालून,महागडी औषधे,लहरी निसर्ग अशा अनेक अडचणीचा सामना करून दर्जेदार बेदाण्याची निर्मिती करतात,मात्र गेल्या काही दिवसात बेदाण्याचे दर पाडले जात आहेत.बेदाणा खरेदी करणारे व्यापारी संगनमतांने दर पाडतात.त्यामुळे अगदी एक नंबर बेदाणा तयार करूनही त्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.
त्यामुळे दर पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचे असे उद्योग बंद करावेत,बेदाण्याला किमान 200 व त्यापेक्षा जास्त भाव मिळावा,
अशी मागणी यावेळी तम्मणगौंडा रवीपाटील यांनी केली.यावेळी जत तालुक्यातील अनेक द्राक्ष,बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या आंदोलनाला जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी उपस्थित राहून पांठिबा दिला.
संबधित यंत्रणांनी याबाबत खबरदारी घ्यावी,अन्यथा यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा देण्यात आला.
सांगली : बेदाण्याला योग्य भाव द्यावा,या मागणीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.









