मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा लटकले | कृषी मंत्री दादा भूसेची घोषणा हवेत ; लाभार्थी 41 शेतकरी अडचणीत

0
16



माडग्याळ,संकेत टाइम्स : राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने  मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी सन 2019-20 मध्ये लागू केलेल्या सामूहिक शेततलाव योजनेतुन लाभ घेतलेल्या व शासनाच्या आराखड्यानुसार काम पूर्ण केलेल्या जत तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 41 शेतकर्यांचे अनुदान तेरा महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही देण्यात आले नाही. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास जाणून-बुजून विलंब व टाळाटाळ केली जात आहे. 






अनुदान रक्कम मोठी असल्याने व त्या अभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून देय अनुदान गेल्या तेरा महिन्यापासून प्रलंबीत ठेवल्याने कृषी खात्याच्या या धोरणाबद्दल मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची भावना असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी जत येथील कृषी कार्यक्रमात येत्या पंधरा दिवसात सामुदायिक शेततलावसह सर्व प्रलंबित अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. 






परंतु ती घोषणा हवेतच विरली आहे. याबाबत सांगली जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी केली असता असे सांगण्यात आले की, जनरल शेतकऱ्यांचे पैसे शासनाकडून वर्ग करण्यात आले आहे. सामूहिक शेततलाव योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे शेततलाव अनुदान मात्र प्रलंबित ठेवले आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदाना पासून वंचित ठेऊन त्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये घोर निराशा आणि पाश्चताप करण्याची वेळ आली आहे.               




सन 2019-20 मध्ये  डिसेंबर ते फेब्रुवारी अखेर जत तालुक्यातील 41 मागासवर्गीय शेतकरयांनी  कर्ज काढून व काहींनी हातउसने काढून चार ते पाच लाख रुपये खर्च करून  शासनाच्या भरवशावर प्लास्टिक कागदासह सामूहिक शेततलावाचे काम पूर्ण केले आहे. पूर्वसंमत्ती घेऊन डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात सर्व 41 शेतकऱ्यांनी काम पूर्ण केले आहे. 






काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अधिकारी येऊन पूर्ण झालेल्या कामाचे जिओ टॅगिंग व मूल्यांकन केले आहे. संबधीत अधिकाऱयांनी मूल्यांकन करून  बारा ते तेरा महिने उलटले.मूल्यांक करून तालुका कार्यालयातुन जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहे. तरी राज्याच्या कृषी खात्याकडून अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. 



शेततळ्याचे अनुदानासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे  मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने व्याजासह मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर वर्ग करावे,अशी मागणी बोर्गी ता.जत येथील सौ जयश्री व्हनखंडे व उमदी येथील शेतकरी मच्छिंद्र सातपुते यांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here