कोल्हापूर : शेतकऱ्यावर अन्यायकारक कृषी कायदे लादणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली ते कोल्हापूर
दरम्यान 80 किलोमीटर ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास ही रँली दिल्लीकडे कुच करेल,असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निघालेला मोर्चा कोल्हापूरतील ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन विसर्जित करण्यात आला.यावेळी,प्रत्येक गावात या मार्चाचे जंगी स्वागत करण्यात आले. धिक्कार असो, अदाणी-अंबानींचे हस्तक असणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो,शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारे कृषी कायदे रद्द झाले पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून टाकला.
श्री शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. याच उद्योजकांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना गुलाम बनवले आहे. त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले जात आहे. मात्र, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे तात्काळ रद्द करावे,अन्यथा केंद्र सरकारलाच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.अन्याय झाल्यास बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू, सरकारला सळो की पळो करून सोडू.
दिल्लीत कृषी कायद्याला विरोधासाठी प्रजासत्ताकदिनी शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे.त्यामुळे आम्ही इथे ट्रॅक्टर मोर्चा काढतोय.केंद्र सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे. कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट दराने विक्री होईल. कायद्याने आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार सरकार करत आहे. वीज बिलाबाबतही सरकारची भूमिका चुकीची आहे.