जत,प्रतिनिधी : कोराना संसर्गामुळे रखडलेल्या जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रसंगी जानेवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे. सरपंच आरक्षणाच्या संदर्भाने तालुका आणि जिल्हास्तरावरील बैठका अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच ग्रामसभांनाही स्थगिती असून सरपंच आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हास्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सध्या मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असून 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या होवू घातलेल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत जानेवारी महिन्यातच खऱ्या अर्थाने स्पष्ट येईल, असे सुत्रांनी संकेत दिले आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत 1 डिसेंबर रोजी मतदान होत असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्याही निवडणुका लवकरच मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रथमत: तालुकास्तरावर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येवून त्यानंतर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंचांचे आरक्षण निघाले.
कोरोना संसर्गाची व्याप्ती पाहता अनुषंगीक विषयान्वये बोलवावयाच्या सभांबाबत जिल्हा प्रशासनाने थेट राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यासंदर्भात अद्याप उलट टपाली पत्रव्यवहार झालेला नाही.आधीच कोरोना संसर्गामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या आता जानेवारी महिन्या अखेर होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.