जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील विविध मार्गावर वाहने अडवून दरोडा टाकल्यानंतर टोळीला काही तासात जत पोलीसांनी जेरबंद केले.
लखन चंद्रकांत पाथरूट (वय 30),निलेश सुखदेव घोडके (वय 28,दोघे रा.विठ्ठलनगर जत),सागर आंबादास साळे(वय 30,रा.शिवाजी पेठ जत),अरविंद प्रकाश मोरे (वय 36,रा.अचनकहळ्ळी),या चौघांना अटक केली आहे.तर अन्य एका तीस वर्षीय अनओळखी संशयिताचा शोध सुरू आहे.
पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,रविवारी ता.11 रोजी साडेदहाच्या सुमारास संशयित पाचजणांनी बोअरवेल्स व्यवसायिक
कपील शामराव गजभिये(वय 28,मुळ गाव बडनेरा,अमरावती जि.अमरावती, रा.अथणी रोड ता.जत) हे बालाजी बोअरवेल्स पाच बोअरवेल्स मशीन जतहून मंगळवेढ्याकडे घेऊन जात असताना अचनकहळ्ळी गावाच्या पुढे एक किमी अंतरावर गेले असताना संशयितांनी त्यांच्या ताब्यातील काळीपिवळी गाडी (क्र.एमएच 10,एडब्लू 9459)ही बोअरवेल्स गाड्यासमोर आडवी उभी करून कपील गजभिये यांना वाईट वंगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख 50,000,दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले होते.
गजभिये यांनी घटना घडताच जत पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत संशयिताचे वर्णन व गाडीच्या क्रमांकावरून पोलीस निरिक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता अडवून दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर खून,खूनाचा प्रयत्न,दरोडा,गर्दी मारामारी असे विविध ठिकाणच्या गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत पोलीस हवलदार सदाशिव कणसे,पोलीस नाईक प्रवीण पाटील,केरूबा चव्हाण, चालक महादेव पाटील यांचा सहभाग होता.
दरम्यान संशयित चौघांना जत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.संशयिताकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे,पोलीस तसा तपास करत आहेत.सा.पोलिस निरिक्षक महेश मोहिते अधिक तपास करत आहेत.
जत- मंगळवेढा मार्गावरील घटनास्थळी पंचनामा करताना पोलीस







