बंद पाकिटातून किंवा बंडलमधून विडी, सिगारेट विकल्यास त्या पाकिटावरील धोक्याची सूचना वाचून लोक सावध होतात असा पक्का समज सरकारचा झालेला दिसतोय म्हणून महाराष्ट्रात पान तंबाखूच्या टपरीवर अथवा कुठल्याही दुकानांतून सुट्ट्या स्वरुपात विडी, सिगारेट तसेच कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केला आहे. हा आदेश स्वागतार्ह असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल का याबाबत मात्र साशंकता आहे
कारण याआधीही यासंदर्भात असे अनेक आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ते आदेश केराच्या टोपलीतच गेले आहेत. तंबाखू, दारु शरीरास हानीकारक आहे असे सावधगिरीचे इशारे दारू व तंबाखूजन्य पदार्थांच्या, पाकिटे, बाटल्या, वेष्टनावर गेली अनेक वर्ष छापले गेले लोकांनी ते वाचून नजरेआडही केले आहे. या इशाऱ्यांचा लोकांवर काही परिणाम झाला का तर काहीच नाही. उलट तंबाखूमुळे कर्करोग होतो, दारुमुळे लिव्हर खराब होते हे माहीत असूनही लोक ते पितात कारण या वस्तू त्यांना सहज उपलब्ध होतात.
कोणत्याही गावात, शहरात जावा एकवेळ तुम्हाला पिण्यास पाणी मिळणार नाही पण विडी, सिगारेट, दारु सहज मिळेल. असे आदेश काढून काहीही होत नाही यापेक्षा सरकारने लोकांचे प्रबोधन करावे. राज्य सरकारने राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे पण आज गुटखा गावागावातील टपऱ्यांवर खुले आम मिळत आहे. गुटख्यावर बंदी असली तरी गुटखा मिळतोच खाणारेही जास्त पैसे मोजून गुटखा खातात.
याला जबाबदार आहे ती येथील भ्रष्ट यंत्रणा. बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारी यंत्रणा थोड्याश्या चिरीमिरीसाठी आपले कर्तव्य विसरते हे सत्य कोण नाकरेल? सरकारने असे आदेश काढण्याऐवजी विडी, सिगारेट यासारख्या तंबाखूजन्य वस्तूंच्या निर्मिती, पॅकिंग, विक्री या सगळ्यांवरच बंदी घालण्याचे धारिष्ट्य दाखवावे. जोवर सरकार हे धारिष्ट्य दाखवणार नाही तोवर असे कितीही आदेश काढले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
जर सरकारने या पदार्थांच्या निर्मितीवरच बंदी घातली तर ते पदार्थ तयारच होणार नाही आणि जर ते पदार्थ तयारच झाले नाही तर ते लोकांना मिळणारच नाही. ना रहेंगी बास… ना बजेगी बासुंरी….पण सरकार हे करणार नाही कारण यातून सरकारला अफाट महसूल मिळतो. या पदार्थांच्या निर्मितीवर बंदी घालून सरकार या महसुलावर पाणी सोडणार नाही. त्यामूळे असेच आदेश निघणारच. याआधीही निघाले आहेत आणि पुढेही निघणार. यातून काही साध्य होणार नाही. फक्त एका नव्या सरकारी आदेशाची भर म्हणूनच लोक याकडे पाहणार.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295