आशाताई गेल्या आणि माझ्या डोळ्यासमोर एक मूर्तिमंत सात्विक सौंदर्य तरळून गेले.त्यांच्यात मनापासून प्रेम करणारी आईच दिसायची. मी खूप हिंदी सिनेमे बघत असल्याने आशाताई म्हणजे पटकन डोळ्यासमोर येतात ‘अपने पराये’ मधील सिद्धेश्वरी. किती सहज आणि नैसर्गिक अभिनयाचा आविष्कार त्यांच्या अभिनयातून प्रकट व्हायचा. अग्निसाक्षी, सौगंध, हमला,प्रेमदिवाने या कमर्शियल तर बासू चॅटर्जी यांच्या कमला की मौत मधील निर्मला पटेल.आणि सदमा मधील मल्होत्रा भाभी अश्या अनेक भूमिकेमधून त्या छोटासा रोल ही खूप जिवंत करायच्या. सिनेमा बघताना काही व्यक्तिमत्व हे आपसूक आवडायला लागतात त्यापैकी आशालता वाबगावकर ह्या होत. त्या सगळ्यांना नक्की आवडायच्या.भूमिका कुठली ही असली तरी त्यांची स्वतः ची एक मोहर त्यावर उठली नाही असे कधीही घडले नाही.जी जिद्द अभिनयात तीच गाण्यात ही प्रतीत व्हायची गर्द सभोवती रान, आणि अर्थशून्य भासे मज हा ही नाट्यगीते आजही आवर्जून ऐकली जातात. विविध गाण्याच्या कार्यक्रमात अनेकांनी ही गाणी सादर करून वाहवा मिळवली आहे. इतका या दोन्ही गाण्यांचा प्रभाव आजही मराठी माणसांवर आजही आहे.
मत्स्यगंधा हे नाटक तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. त्यात त्यांनी साकारलेला टायटल रोल रसिकांच्या स्मरणात आहे .वसंत कानेटकर यांच्या लेखणीने आणि दिग्दर्शक मा. दत्ताराम यांचा परिस स्पर्श लाभलेल्या या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतुक झाले. त्यांच्यातील गायिकेला या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते त्यांनी चांगली संधी आशाताई ना दिली. पं.अभिषेकी यांनी नाट्यपदा ना एक नवा ढंग दिला तो आशाताई यांच्या आवाजातून योग्य प्रकारे साकारला गेला. एक अल्लड तरुणी ते राजमाता पर्यंत चा समग्र प्रवास त्यांनी उत्कृष्ठ पणे पेलला. गायिका म्हणून ही त्यांनी आपला अवीट श्रोता निर्माण केला.त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता ही आरती आजही गणेश मंडळात वाजत असतेच चांदण्यांची रोषणाई राजसा राजकुमारा, चांद भरली रात, जन्म दिला मज, तव भास अंतरा झाला मन रमता मोहना ही त्यांनी गायलेली काही गाणी अजरामर झाली आहेत.या नाटकाने त्याचे खूप नाव झाले आणि अमाप प्रसिद्धी ही मिळवून दिली. हे नाटकच त्यांच्या अभिनय प्रवासातील मानदंड ठरले.
या यशानंतर नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अभिनय हाच व्यवसाय स्वीकारून त्यांनी आता ही नोकरी सोडली. मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशाताई मुंबई येथील अनेक नामांकित नाटय़संस्थां मधून त्यांनी आजवर पन्नासहून जास्त नाटकांतून अभिनय केला आहे. या सर्व नाटकांचे सुमारे पाच हजारांहून जास्त प्रयोग झाले आहेत.मदनाची मंजिरी, गरुडझेप,गारंबीचा बापू,
रायगडाला जेव्हा जाग येते,तरुण तुर्क म्हातारे अर्क,स्वामी, छिन्न, विदूषक,तुज आहे तुजपाशी, देखणी बायको दुसऱ्याची, हे बंध रेशमाचे, भावबंधन
ही गोष्ट जन्मांतरीची, गुंतता हृदय हे, ही त्यांची काही गाजलेली नाटके खूप गाजली. पुढचं पाऊल, माहेरची साडी, एकापेक्षा एक, उंबरठा, आत्मविश्वास अश्या अनेक मराठी चित्रपटही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेतच.
काळूबाई बाई च्या सेट वर अनेकांना कोरोनाची लागण झाली आणि आशाताई ना ही कोरोना ने घेरले. काल पासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने रसिकांना हळहळ वाटत होती, आशाताई ह्यावर ही मात करून सुखरूप परततील अशी आशा वाटत होती पण आज सकाळी काळाने घाला घातला आणि एका अद्वितीय अभिनेत्री आणि उत्कृष्ठ गायिकेची प्राणज्योत मावळली.
आशाताई च्या जाण्याला कोरोनाची जी पार्श्वभूमी लाभली ती मात्र खूप दुर्दैवी आहे.आशाताई तुम्ही अश्या जायला नको होत्या. ही खंत आता आयुष्यभर राहील. तुमच्या मुळे आता पडद्यावरील अस्सल सात्विक सौन्दर्य हरवले, हेच खरं.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना,भावपूर्ण श्रद्धांजली..
समीर मित्रा, कोल्हापूर