जत,प्रतिनिधी : जत शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत शहर कोरोना नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या जनताकर्फ्यु ला जत जत पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यांचे पूर्णतः असहकार्य तर शहरातील विविध व्यवसाईक व जत शहरवासियांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याने दहा दिवसांचा जनताकर्फ्यु यशस्वी झाल्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगलीचे जिल्हाध्यक्ष तथा जत शहर कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय कांबळे व जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा समितीचे उपाध्यक्ष परशुराम मोरे यांनी संकेत टाइम्सशी बोलताना सांगितले.
जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे 884 पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर या पैकी 558 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 34 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.कोरोनाबाधित रूग्णांची जत शहरासह तालुक्यातील संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनापुढे हा एक चिंतेचा विषय झाला आहे.जत तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेता ती हाताबाहेर चालली असून जत शहर कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे.
त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन जत शहर कोरोना नियंत्रण समितीची स्थापना केली. कोरोनाची वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी या समितीने शुक्रवार दि. 11 सप्टेंबर पासून दहा दिवसांचा जनताकर्फ्यु पाळण्याचे आवाहन जत शहरातील नागरिकांना केले होते.जनताकर्फ्यु मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता जत शहरातील सर्वच दुकाने पूर्णपणे बंद होती.
जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई,पोलीस निरीक्षक उत्तम जाधव,तसेच तालुक्यातील महसुल प्रशासन यांनी आम्ही त्यांचेकडे जनताकर्फ्यु बाबत वारंवार सहकार्याची अपेक्षा करून ही त्यानी आम्हाला या बाबतीत असहकार्यच केल्याने या यंत्रणेविषयी आम्हाला खेद वाटतो,असा आरोप कांबळे व मोरे यांनी केला.
यापुढे जत शहरातील कोरोना फैलाव रोकण्यासाठी ही समिती काम करत राहील,असेही त्यांनी सांगितले








