जनजीवन सामान्य होण्यासाठी ‘एसटी’ धावायलाच हवी

0दीडशे दिवसांनंतर खऱ्या अर्थाने एसटी आता जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून धावू लागली आहे. राज्यातील 50 हजार गावांना विकासवाट दाखवणारी एसटी ग्रामीण महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेची जीवनरेषाच आहे आणि आता ती पुन्हा मार्गक्रमण करू लागली आहे. लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना पहिला फटका एसटीलाच बसला. आणि त्यामुळे  ग्रामीण जनता, स्थलांतरित मजूर यांचे अस्तित्वच बेदखल करण्यात आले. साहजिकच कुणाला काम बंद झाल्याने घर गाठण्यासाठी वाहन मिळाले नाही, तर कुणाला कामाच्या शोधात दुसरीकडे जाता आले नाही. कुणी शहरात जाऊ न शकल्याने परीक्षेपासून वंचित राहिला, तर कुणाला तालुक्याच्या गावी पोहोचता आले नाही म्हणून पीक विम्याला पारखा झाला. 
काही लोकांनी पायी प्रवास करता करता घरी जाण्याअगोदरच वाटेत दम तोडला. खरे तर काही लोकांचे भयंकर हाल झाले. हा काळ कुठलाच माणूस आयुष्यात कधी विसरणार नाही. नंतर अनलॉक झाले तरी आंतरजिल्हा प्रवेशासाठीच्या प्रवेश पासव्यवस्था ठेवण्यात आली. त्यातल्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. वशिलेबाजी आणि दलालीने माखलेल्या ‘ईपास’ या प्रकारामुळे तर सामान्यांच्या वाट्याला सुरक्षित प्रवासापेक्षा मनस्तापच अधिक आला. एसटी सुरू करण्याचा निर्णय घेताना ई पासला लावलेली कात्री त्यासाठीच आवश्यक होती. मुळात एसटी वाचवायला हवी आहे. कारण त्यामुळे तिचे कर्मचारी देखील बेरोजगारीपासून वाचणार आहेत. Rate Cardआज हजारो चालक-वाहक काम नाही, पगार नाही अशा विपन्नावस्थेत घरी बसून आहेत. इथे सगळ्यांना रोजी-रोटी मिळाली पाहिजे. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांचाही हक्क आहे. यापूर्वी जिल्ह्या जिल्ह्यात एसटी एसटी सुरू झाली आहे,मात्र तिला अजून म्हणावा असा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरच्या वापराकडे कटाक्षाने लक्ष देत, मर्यादित प्रवासी संख्या आणि उचित अंतराचे पालन करून ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे ब्रीद खरे करून दाखवण्याचे आव्हान महामंडळापुढे आव्हान आहे.  प्रवाशांनाही आपली काळजी घेऊन प्रवास करायला हरकत नाही. कारण अजून किती दिवस घरात बसून दिवस काढायचे, असा प्रश्न आहे. कोरोना संसर्गाच्या सानिध्यात त्याच्यासह जगताना फक्त आपली काळजी आपण घेतली पाहिजे. मुळात म्हणजे एसटी सुरू होणे हे पुढच्या व्यापक अनलॉकच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. त्यासाठी सर्व घटकांनी संयम आणि नियमांचे काटेकोर पालन करत संपूर्ण अनलॉकसाठी आपण सिद्ध असल्याचे दाखवून द्यावे लागेल. तसे झाले तर ‘लालपरी’च्या साथीने पूर्वीसारख्या सर्वसामान्य जनजीवनाचे स्वप्न साकार होईल.आणि शेवटी याला पर्याय नाहीच.मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.