जत,प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे.या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी धनगर विवेक जागृत्ती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.तसेच अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे,अशी भुमिका ढोणे यांनी मांडली आहे.असे न झाल्यास आंदोलन करू इशाराही त्यांनी दिला आहे.
ढोणे यांनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अनुषंगिक मागण्या केल्या आहेत. अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेले अडीच महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे.धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभे करण्याचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्वजण अस्तित्वाची लढाई लढत असताना कुलगुरू फडणवीस यांनी अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून अनुषंगिक बैठका घेतल्या आहेत.
त्यांनी मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे.काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोनवेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत.कुलगुरू फडणवीस या स्मारकाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात वाईट प्रघात पाडत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. जनतेची आर्थिक ससेहोलपट सुरू असताना त्यांनी धनगर समाजातून लोकवर्गणी काढून स्मारक पुर्ण करण्याचा घाट घातलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा, तसेच अहिल्यादेवी होळकर यांना एका जातीत बंदीस्त करण्याचा हा प्रकार आहे.
त्यामुळे डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी राबवलेल्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.आज अहिल्यादेवींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आम्ही शासनाला हे निवेदन देत आहोत. ज्या अहिल्यादेवींनी लोकोद्धारासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले. त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, हा प्रकार चुकीचा आहे. याउपर फक्त धनगर समाजाची वर्गणी डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेले नियोजन जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा आणि अहिल्यादेवींची सुरू असलेली अवहेलना थांबवाबी,असेही ढोणे म्हणाले.