सांगलीत 400 खाटांचे हॉस्पीटल उभारणार ; पालकमंत्री जयंत पाटील |भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

0



सांगली : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 









भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 








पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे.









आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली  असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत.










सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे.

जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. 

Rate Card










यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे,  मात्र  त्याला  उंबरठ्यावरुनच  परत  पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  










जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे   नियोजन, नदीकाठच्या  लोकांना  सावधानतेचा  इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती.  यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्ग करून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या  गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत  ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 










कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत.

प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे,  कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला.

पूरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.