पितृतुल्य लोकनेते ; राजारामबापू पाटील

0



लोकनेते स्व.राजारामबापू पाटील जन्मशताब्दी विशेष

    


  

आज दि 1 ऑगष्ट 2020 रोजी लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांचा जन्मशताब्दी दिवस आहे.यानिमित्ताने स्व.बापूंच्या आठवणींना मी ऊजाळा देत आहे.

लोकनेते स्व.राजारामबापू पाटील हे लोकांच्या कायम मनामध्ये घर करणारे नेते होते. स्व. बापूंचे कार्यकर्त्यांचे भांडवल खूप मोठे होते. जिवाला जिव देणारी माणसे बापूंजवळ होती. बापू जनतेच्या प्रश्नांपर्यंत भिडत आणि ते प्रश्न जाणून घेण्यासाठी जनतेच्या वाड्यावस्त्यांवर जायचे.बापूंनी अनेकवेळा गरिबांकडची चटणी, भाजी-भाकरीचा आस्वाद घेत अनेकदा कार्यकर्त्यांच्या वाड्या-वस्त्यांवर मुक्काम केला आहे.असेच बापूंचे हाडाचे कट्टर कार्यकर्ते होते माझे वडील म्हणजेच प्रतापपूरचे माजी सरपंच, धावडवाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, प्रतापपूर तलावाचे जनक पै. बाळासाहेब शेख (कोट)..

स्व.राजारामबापूंनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पोटच्या पोराप्रमाणे,धाकट्या भावाप्रमाणे प्रेम दिले.स्व.राजारामबापूंचे कार्यकर्ते हे फक्त सांगली जिल्हाच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात जोडले गेले होते.त्याकाळी आत्तासारखी सोशल मीडिया नव्हती कि एखाद काम केलं कि लगेच सोशल मीडियावर फोटो अपलोड होतो. तर त्याकाळी होता फक्त प्रामाणिकपणा आणि निस्वार्थीपणा या दोन तत्वांवरच कार्यकर्ते जिवाला जिव देत होते.


गाव तिथे आड योजना

स्व.बापूंचे धावडवाडीसाठीचे योगदानही खूप मोठे आहे.1962-63 साली स्व.बापू हे सांगली लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना बापूंनी सबंध सांगली जिल्ह्यामध्ये गाव तिथे आड ही योजना आंमलात आणली.बापू हे दूरदृष्टी नेते होते.बापूंनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात *गाव तिथे आड या योजनेमुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करून दिली. आमच्या धावडवाडी गावामध्ये ओढ्यानजीक असलेले दोन आड हे स्व.बापूंनी आणलेल्या योजनेतीलच आहेत.जे आजतागायत सुस्थितीत आहेत. 


प्रतापपूर इरिगेशन तलाव


पै.बाळासाहेब शेख यांनी प्रतापपूरच्या सरपंचपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम ठराव केला तो प्रतापपूर इरिगेशन तलावाचा. त्याकाळी या तलावास भरपूर प्रमाणात विरोध झाला.जेणेकरून या तलावाचा ठराव मंजूर होऊ नये म्हणून,परंतु या विरोधास न जुमानता स्व.बापूंनी या तलावास अमेरिकन अर्थ सहाय्याने मंजूरी मिळवून दिली.(धावडवाडी एस टी स्टॅण्डवरती प्रतापपूरकडे जाणार्या रस्त्याकडे बाण करून बोर्ड होता “अमेरिकन अर्थासहाय्यित प्रतापपूर इरिगेशन तलावाकडे” जो हायवेच्या कामात अडथळा आला म्हणून 2018 मध्ये सदर बोर्ड काढला गेला. या तलावाच्या ठरावास आणि मंजूरीसाठी पै. बाळासाहेब शेख यांना जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती कै.रामराव सावंत, सिद्राम मोर्डी, बसवराज पाटील,आप्पासाहेब दुगानी, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे तत्कालीन सभापती कै.नानासाहेब सगरे या सर्वांची मोलाची साथ मिळाली. ही सगळी मंडळी स्व. राजारामबापूंचे कार्यकर्ते होते.या तलावाच्या प्रशासकीय मंजुरीनंतर स्व.राजारामबापूंच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम घेण्याचे ठरवले परंतु बापूंच्या कामाच्या व्यस्ततेमुळे तारीख मिळू शकली नाही. त्यामुळे हे भूमिपूजन तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांच्याहस्ते 10 जानेवारी 1984 रोजी करण्यात आले.

Rate Card


धावडवाडीतील डबलमजली शाळा


धावडवाडी गावात ग्रामपंचायतीच्या समोरील मुख्य चौकातील पिंपळाच्या झाडासमोर एक लाकडी दुमजली शाळा होती. तिला पुर्वी डबलमजली शाळा म्हणत.1962-63 साली स्व.राजारामबापूंनी ही शाळा मंजूर करून दिली होती.ही शाळा 1990 पर्यंत सुस्थितीत होती,परंतु त्या नंतरच्या काळात या शाळेची व्यवस्थित निगा आणि डागडूजी न झाल्याने ती शाळा मोडकळीस आली आणि जिर्ण होऊन जमिनदोस्त झाली.आता चाळीस ते सत्तरी गाठलेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीने याच शाळेत आपल्या शिक्षणाला सुरूवात केली होती.1990 नंतर जन्मलेली मुले या शाळेला पडकी शाळा म्हणत. या शाळेच्या पुर्वी गावात शाळेला स्वतः ची अशी इमारत नव्हतीच! ही गोष्ट स्व. राजारामबापूंच्या कानावर पै. बाळासाहेब शेख, पै. नबी शेख (पटेल) व पै. बाबालाल शेख यांनी घातली. स्व. बापूंनी शाळेच्या इमारतीला मंजूरी मिळवून दिली. परंतु या शाळेच्या इमारतीसाठी लाकडाची आवश्यकता होती. स्व. बापूंनी सांगली टिंबर एरियातील लाकडाच्या व्यापाऱ्याला चिठ्ठी लिहून दिली कि, “शाळेचं काम आहे आणि आलेल्या व्यक्तिंना इमारतीला लागतील ती लाकडे द्या,पैशाची जबाबदारी मी घेतो” असे सांगितले. इमारतीला मंजूरी जरी मिळाली असली तरी इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर शासनाकडून पैसे मिळणार होते. लाकडाच्या व्यापाऱ्याने लागतील ती लाकडे दिली आणि ट्रक भरून उभा केला.परंतु ट्रकचे भाडे द्यावे,इतकीही परिस्थिती नव्हती,मग पै.बाबालाल शेख,पै.नबी पटेल व पै. बाळासाहेब शेख यांनी स्व.राजारामबापूंचे त्यावेळेचे सांगलीतले घर गाठले आणि सद्य परिस्थितीत सांगितली.तर स्व.बापूंनी क्षणाचाही विलंब न करता ट्रकच्या भाड्याचे 200 रू या तीन कार्यकर्त्यांच्या हातात दिले. त्यानंतर या तिघांनी ट्रक गावाकडे आणला आणि कालांतराने शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले.असे होते स्व. राजारामबापू कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणणारे, त्यांना आपलेसे करणारे साक्षात देवमाणूस.


स्व.बापूंचे ते ना.जयवंतराव पाटील यांचे धावडवाडी एज्युकेशन सोसायटीशी नाते


 पै. बाळासाहेबांनी स्व. बापूंच्या माध्यमातून 12 जून 1967 साली न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडीची स्थापना केली.बाळासाहेंबानी या न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी नावाचे लावलेले रोपटे आज महाकाय वटवृक्षात पदार्पण करत आहे.बाळासाहेबानंतर मी धावडवाडी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली.बाळासाहेबांना स्व.बापूंनी जसे प्रेम दिले तसेच प्रेम आणि आपुलकी आज मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील देत आहेत.ना.जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या न्यू. इंग्लिश स्कूल शाळेच्या इमारती करता क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर खा.सचिन तेंडुलकर यांनी तब्बल 40 लाख रूपयांचा निधी मंजूर करून दिला.आणि शाळेची भव्य दिव्य अशीलइमारत उभी राहीली आहे. 

आज पै.बाळासाहेब शेख आणि स्व.बापू हे दोघे हयात नाहीत परंतु आजच्या घडीला  असा सच्चा नेता आणि सच्चा कार्यकर्ता भेटणे मुश्किल आहे.आज 1 ऑगष्ट 2020 रोजी स्व. राजारामबापूंचा जन्मशताब्दी दिवस आहे. स्व. बापूंनी केलेले समाजकार्य हे अजरामर आहे.या अमृत्तदिनी स्व.बापूंच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली..!



श्री.महंमदअली बाळासाहेब शेख 

अध्यक्ष,धावडवाडी एज्युकेशन सोसायटी धावडवाडी 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.