धनगर आरक्षणाचा वापर राजकारणासाठी होवू देणार नाही : विक्रम ढोणे

0
6



जत,प्रतिनिधी : धनगर आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही हा प्रश्न विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही, हा निर्धार समाजाने केल्याचे धनगर विवेक जागृत्ती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.

सहा वर्षापुर्वी (2014) साली देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येवून धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते.तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपल्या प्रचारसभांत घेतला होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवर धनगर समाजाने विश्वास ठेवला, मात्र प्रत्यक्षात समाजाचा विश्वासघात झाला. नियोजन बद्धरित्या फसवणूक करण्यात आली. म्हणून फडणवीस यांनी बारामतीत आश्वासन दिलेला 29 जुलै हा दिवस ‘आत्मचिंतन दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन धनगर विवेक जागृत्ती 

अभियानाच्यावतीने करण्यात आले होते. 

धनगर आरक्षणाच्या नावाखाली फक्त व्होटबँक पॉलिटिक्स सुरू आहे.

भाजपने तर पंधरा वर्षापासून फसवणुकीची मालिका सुरू ठेवली आहे.अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदीपर्यंत अनेक भाजप नेत्यांनी धनगर आरक्षणावर मेळावे भरवले, मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही, हे वास्तव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर समाजाला संभ्रमित करून ठेवणारे नेते तयार केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रात धनगरांच्या बाजूचे काही नाही, मात्र फडणवीसांचे हस्तक चुकीची माहिती देत आहेत.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपसोबत आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. सद्या मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असतानाही त्यांनी भाजपसारखेच धोरण घेतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आरक्षणाचे लेखी आश्वासन दिले होते. 

बहुतेक सर्व पक्षांनी धनगर समाजाचा वापर करून घेतला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांबद्दल आत्मचिंतन करून पुढील दिशा ठरवण्यासाठी 29 जुलैला सोशल मिडीयावर व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरात चर्चा, संवाद घडल्याचे ढोणे यांनी सांगितले.

ढोणे म्हणाले की, समाजातील युवक वर्गात जाग्रती येवू लागली आहे. नेते बोलले काय आणि केले काय, याचा विचार समाज करू लागला आहे. राजकीय डावपेच समजून घेवू लागला आहे. यासंबंधाने अनेकांनी आपली मते सोशल मिडीयावर व्यक्त केली आहेत. कोल्हापूरपासून नागपूरपर्यतच्या लोकांनी याप्रश्नी फोनवर चर्चा केली आहे. ‘सर्वच पक्षांनी समाजाची फसवणूक केली आहे. आता त्यांना भुलायचे नाही’ असा निर्धार यानिमित्ताने समाजातील सुशिक्षीतांनी केलेला आहे. 

प्रस्थापित पक्ष पाहिजे तेव्हा धनगर आरक्षणाचा विषय बाहेर काढतात आणि 

नको असेल तेव्हा त्याकडे पाहतही नाहीत, हे वास्तव आहे. यापार्श्वभुमीवर राजकीय पक्ष हा प्रश्न त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही हा प्रश्न विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही.

गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांनी धनगर समाजाला वेळोवेळी 

एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र नियोजनबद्ध फसवणूक केली. त्यांच्याशिवाय इतर नेत्यांनीही आजवर समाजाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे सर्वजण नामानिराळे झाले आहेत, मात्र धनगर समाज हा प्रश्न विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, हा निर्धारही समाजाने केल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here