कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला.दरम्यान संपूर्ण राज्यभरात मिळून 242 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.या 242 विद्यार्थ्यांपैकी 151 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत.
राज्याच्या एकूण निकालामध्ये राज्यात कोकण विभाग हा 98.77टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर राहिला. कोल्हापूर विभागाचा निकाल हा 97.64टक्के इतका असून संबंध राज्यात दुसरे स्थान पटकाविले. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के आहे.
गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात 11.6 टक्के वाढ झली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 96.99 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.90 टक्के आहे.
कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 98.21 टक्के, सातारा जिल्ह्याचा निकाल 97.25 तर सांगली जिल्ह्याचा निकाल 97.22 टक्के इतका लागला आहे.तीनही जिल्ह्यातील मिळून 354 परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली होती. विभागातून 1,33,917 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख 30 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते आठ ऑगस्टपर्यंत तर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी निकाल जाहीर केला.