आत्म्याचे मूळ तत्व परमात्माच होय ; निरंकारी बाबा
ज्याला मनातला (ज्ञान) प्रकाश लाभतो, तोच खऱ्या अर्थाने माणूस म्हणवला जातो, त्याचं कल्याण होतं आणि माणूस उपाधिला पात्र असलेल्या माणसाचं खरं मोल वाढतं. त्याला हीऱ्याप्रमाणे जीवन लाभतं. कारण या सत्याएवढे, सत्यरुपी परमेश्वराएवढे दुसरे काहीही मौल्यवान नाही. सत्याची जाणीव होणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय होय. भगवान श्रीकृष्णांनी हाच मार्ग सांगितला – जे जाणण्यायोग्य आहे (ते जाणण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे). कारण आत्म्याने आपल्या मूळतत्वाला जाणायचं आहे. परमात्माच आत्म्याचे मूळतत्व आहे. डोंगर, कडे, कपारी, समुद्र किंवा अन्य शक्ती आत्म्याचे उगमस्थान नाहीत. आत्मा परमात्म्याला जाणून स्थिरपद प्राप्त करतो. अडोल, अडीग, समरस राहणारी ही परमसत्ता सर्व वस्तूंमध्ये संचार करते, या सत्तेचाच मी एक अंश आहे. ही सत्ता एकमेवाद्वितीय आहे हा बोध झाल्यावर मानवार्माची जाण येते. अन्यथा अज्ञानाचेच साम्राज्य आहे सगळीकडे. जोवर मनुष्य अज्ञानात रेंगाळतो तोवर मन:शांतीचा लवलेशही आढळत नाही. भ्रमाचा खेळ सदैव चालत राहतो. घृणा, वैर, भीती, क्रोध यांच्या सावल्यांचा नाच चालतो. कारण सत्याशी संधान जुळलेलं नाही, बोध झाला नाही. सत्याचा बोध झाला की सर्व संदेह संभ्रम लयास जातील आणि मग माणसाला जाणवेल की प्रत्येक घरात हा परमेश्वर उपस्थित आहे. कोणीही त्यापासून दुर नाही, वेगळा नाही. समस्त ब्रह्मांडात या एका परमपित्याचाच वास आहे. सर्व ग्रंथ, वेदशास्त्र यांच्याबद्दल आपल्याला आस्था आहे. आम्ही त्याचे श्लोक, वचनं वाचतो. तिथे लिहीलंय की परमेश्वर एक आहे. म्हणून म्हणावं लागतं की परमेश्वर एक आहे.
परमेश्वर एक आहे, हे मानणं (लोकांना) अवघड जात आहे. मग काय मानतो आहोत आपण? माझा राम आहे आणि त्याचा अल्ला आहे, माझा वाहेगुरु आहे आणि त्याचा निरंकार आहे, माझा गॉड आहे… वगैरे. मान्यता देताना हीच अवस्था होते आहे सगळीकडे. असं का बरं होतं? कारण याला जाणलं नाही. मग तरीही ईश्वर एक आहे असं आपण का म्हणतो? उत्तर सोपं आहे – धर्मग्रंथांत तसं लिहीलं आहे, त्याच्याविषयी यआपण आस्था बाळगतो, त्याच्यासमोर आपण डोकं ठेवतो, स्वत:ला समर्पित समजतो (म्हणून.) आता त्या धर्मग्रंथशास्त्रांत लिहीलीं ओ की परमात्मा एक आहे. म्हणून आपला नाईलाज आहे. पण ज्यांनी हे लिहीलं त्यांना बोध झाला होता, त्यांनी सर्व घटांमाजी याचाच निवास आहे हे अनुभवलं होतं.एकाला जाणून, एकाला मानून ते एकरुप होवून जगले होते. त्यांच्या अंतरी प्रत्येकाविषयी एकात्मतेची भावना होती. आज एकतेचा अभाव का आढळून येतो? धर्मग्रंथांत लिहीलेलं वाचलं तरी एकतेचा अनुभव घेतला नाही, ती दृष्टी प्राप्त झाली नाही. म्हणून पावलोपावली दुराव्याच्या भिंती दिसून येतात, परकेपणाची भावना, आपपर भाव दिसून येतो. सगळीकडे नुसता हाहाकार ! एका जागी हा दुरावा लिंपण्याचा प्रयत्न होतो तर दुसऱ्या जागी भेग पडते. समुद्रातल्या लाटांसारखी अवस्था आहे ही. एका ठिकाणी लाटा थंडावतात तर दुसरीकडे निर्माण होतात. तिथल्या लाटा नाहीशा झाल्या तर परत आणखी एका ठिकाणी लाटा उठतात. त्याचप्रमाणे एका जागी हाहाकाराचे शमन होते न होते तोच दुसऱ्या जागील टाहो फुटतो. एका जागी हिंसा थांबते तर दुसऱ्या ठिकाणी हिंसेचे थैमान सुरु होते, एका स्थळी दुरावा नष्ट होतो तर इतरत्र तो दिसून येतो. कारण शोधायला हवं! या निराकार परमेश्वरापासून माणूस दुरावला आहे, या परमसत्तेपासून त्याने फारकत घेतली आहे, सत्याला जाणून घेण्याचा तो प्रयत्न करीत नाही (हेच याचे मुख्य कारण आहे.). सत्याचा बोध करुन घेतला तरच माणूस माणसाला ओळखिल, जवळीक साधण्याचासंकल्प करील, परमपिता परमात्म्यापासून फारकत घेतली की माणसापासून फारकत घेतली जाते. (मात्र) आत्म्याचा बोध झाला, स्वत:ची ओळख झाली, परमेश्वराला जाणून घेतलं की मनात सुंदर भाव उपजतात, मन स्थिरावतं आणि जीवन सुखमय होते.