रेखा व मीरा मनसोक्त गप्पा मारत बसलेल्या,खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळालेला म्हणून गप्पाना विषयाचे बंधन न उरता ऊत आलेला होता. तेवढ्यात मिराची मुलगी मनाली शाळेतून घरी आली.”शी यार!आई कसल्या मूर्ख असतात ग या मुली?अग नावं ठेवायला दुसरे काही सापडले नाही कि या मुली लगेच रंगावर उतरता बघ,लगेच काळी म्हणून हिणवायला बघतात.”दहावीत असलेली मनू आई कडे तक्रार करत होती. खरे तर हे फार नेहमीचे झालेले होते.
अच्छा! म्हणजे पुन्हा तेच सुरु झाले तर. मिराची मुलगी मनाली दहावीत असलेली,हुशार,शांत,सालस, व आकर्षक व्यक्तिमत्व असलेली.तरीही केवळ आई वडील सावळे म्हणून तिचाही रंग सावळा,तरीही खूप शोभून दिसणारा. परंतु वयाने वाढणाऱ्या या मुलींच्या डोक्यातील ‘गोरा रंग सौदर्याचं प्रतीक’ हे भूत काही केल्या जात नाही. उमलणाऱ्या या वयात हे रंगाचे भूत बसविणारं कोण?आपणच कि! मोठी माणसेच याला कारणीभूत असतात.
हे फक्त मुलीच्याच वाटेल येते असे नाही तर रेखाच्या मैत्रिणीलाही तिच्या मुलासाठी हीच तक्रार घेऊन शाळेत जावे लागले होते. कारण तिच्या मुलालाही “ये काळ्या” म्हणत सतत चिडवले जात होते. मीरालाही मनूच्या बाबतीत हा अनुभव काही नवा नव्हता. अनेकदा खचून जाणाऱ्या आपल्या मुलीला मीराने अशा प्रसांगाकडे खंबीर पणे सामोरे जाणे शिकवले होते. आपण इतरांना बदलू शकत नाही म्हणून स्वतःच अशा निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्षित करून आपल्या जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करणे व स्वतःची प्रगती साधने असा विचार करायला तिने मनालीला शिकवले होते. आजही तिने मुलीची समजूत काढून तिला शांत केले. पण स्वतःला कसे शांत करावे हे मीराला सुचेना. असे रंगावरून हिणवणे किती दिवस चालणार?
मिराच्या चार मामेबहिणी,तिच्या चांगल्या मैत्रिणीही होत्या. पण जशा सगळ्या लग्नाच्या वयात आल्या तशी तुलना सुरु झाली ती केवळ रंगावरून. मीरा सर्वांमध्ये हुशार, अगदी स्वतःच्या पायावर उभी असलेली तरीही गोऱ्या मामेबहिणीं समोर होणारी अवहेलना तिला सोसावी लागली.अगदी स्वतःच्या आई व आजी कडून ऐकावे लागले,” कसे होणार या काळीचे?”
एकीकडे सावळ्या कृष्णाची पूजा केली जाते ,तर दुसरीकडे गोऱ्या रंगाला सौदर्याचे मापदंड ठरवले जाते.
आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास बघितला तर सौदर्याच्या मापदंडात कोठेही गोऱ्या रंगाच्या महतीचा उल्लेख नाहीच. नाकेडोळे नीटसं,आकर्षक व्यक्तिमत्व, व त्याहूनही उत्तम स्वभाव काय असते या पेक्षा वेगळे सौदर्य? ते आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवायला हवे, केवळ दर्शिक सौदर्यांवर भाळणे म्हणजे निव्वळ निर्बुद्धताच म्हणावी लागेल.
‘डार्क इज ब्युटीफुल ‘ या अभियानाच्या माध्यमातून भारतात अभिनेत्री नंदिता दास हिने २००९ पासून सावळ्या रंगाचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु केले.ती सुद्धा या वाईट अनुभवातून गेलेली आहे. परंतु इंग्रज भारतातून गेले खरे पण त्यांच्या गोऱ्या रंगाचा पगडा ते लोकांच्या मनावर काही प्रमाणात तसाच ठेऊन गेले. भारत हा उष्ण कटिबंधातील देश असल्याने नितळ सावळा हाच आपल्या कडील त्वचेचा खरा रंग आहे. परंतु गोरे बनविण्याचे स्वप्न दाखवत विविध लोशन व सौन्दर्य प्रसाधनांच्या जाहिरातींनी भुरळ घालून लोकांना आपल्या मायाजालात फसविले. त्या वस्तूंच्या वापरामुळं कुणी गोरे झाल्याचे ऐकिवात नाही, परंतु गोरे बनविण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांनि मात्र मस्त कमाई केली. पुढे लेखक कवी, गीतकार यांच्या हि लेखणीतून नितळ गोरा रंग, गौरवर्ण स्त्री वर्णन करताना पाझरत गेला.
आत्मकथेत महात्मा गांधींनी हि म्हटले आहे,”खरे सौन्दर्य हे मनाच्या आत्म्याच्या पावित्र्य मध्ये असते. तुमचा बाह्य रंग त्यासाठी कधीच महत्वाचा नसतो. डॉ. क्वार्ल्स या विचार वंताच्या मतेही सौन्दर्य हे सद्गुणांवर अवलंबून असते. सुंदर गुण, सुंदर मन हे खरे सौन्दर्याचे प्रतीक आहेत.
बरं या तंत्रज्ञानाच्या पुढारलेल्या युगात तरी विचारप्रवृत्ती बदलेल म्हणावं तर आजही सोशल मीडियावर गोरा रंग मिळवण्याचे अनेक उपाय सुचविणारे विविध पोस्ट व विविध व्हिडीओ रोजच उपलोड होतात,आणि त्यांना बघणाऱ्यांची संख्याही आच्छर्यकारक आहे.
आजही घरात असलेल्या दोन अपत्यांमध्ये रंग भेद असेंल तर सहज बोलता बोलता गोऱ्या रंगाचे कौतुक व तुलना केलीच जाते. परिचयातील एक लेखक असलेल्या विचारी गृहस्थांची मुलगी रंगाने अतिशय गोरी,तर हे महाशय सावळ्या कॅटेगरीत मोडणारे तरीही त्यांच्या तोंडी सतत असे, ‘माझ्या मुलीला आनंदाने कुणीही पसंत करेल!” सांगायचे तात्पर्य हेच कि जी लहान मुले शाळेतील भांडणात सहज एकमेकांना काळ्या गोऱ्या रंगावरून वेगळं ठरून हिणवतात ,हा भेद त्यांच्या डोक्यात येतो कोठून? तर नक्कीच त्यांच्यावर प्रभाव असलेल्या मोठ्या व्यक्तींकडून कळत नकळत आलेला असतो. म्हणूनच प्रत्येक पालकाचे हे कर्तव्य आहे कि रंगाला नाही तर सद्गुणांना महत्व देणे शिकवावे. गोरा रंग हि कुठली पदवी हि नाही कि कुठले क्वॉलिफिकेशन हि नाही. सुदृढ शरीरात निरोगी व चांगला विचार करणारे मन असावे हेच खरे सौन्दर्य.
“काले गोरे का भेद नही, हर दिल से हमारा नाता है,” हे फक्त गुणगुण्या पुरते न राहता ते सर्वांनी मनापासून आत्मसात करणे हि गरजेचे आहे.
महत्वाचे म्हणजे काळा किंवा सावळा रंग असणाऱ्या मुले मुली व महिलांनीही खचून न जाता स्वतःवर प्रेम करणं शिकले पाहिजे. कुणाच्या हि प्रतिक्रियेवर आपले मनोबल खचेल एवढे कमजोर न राहता मनाने सुदृढ होणे शिका. विचार करण्यासारख्या अनेक समस्या आहेत, करता येण्या सारखी अनेक चांगली कामे आहेत,तर का मग आपण स्वतःला या रंगांच्या बेरंगी दुनियेत गुंतवून स्वतःला दुःखी करून घ्यायचे! त्यापेक्षा गुणगुणायचे… एकाच या जन्मी जणू ..फिरुनि नवी जन्में मी.
मनीषा चौधरी -वाघ
नाशिक,9359960429