वाऱ्या सारखी बातमी सर्वत्र प्रसरली आणि एकही दिवस शाळे पासून दुर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे शासन आदेश आल्यानंतर शाळेकडे मुले यायची बंद झाली. उन्हाळी व दिवाळी सुट्टीत ही मुले शाळेत येत होती आणि कोरोना मूळे माझ्या शाळेतील मुले माझ्या पासून तर दूर झालीच पण शाळेपासून पण दूर झाली. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेतील प्रत्येक वृक्षाचे मिञ बनले होते .ते प्रत्येक वृक्षाला ही सोडून दूर गेली
घरी अंतर्मन स्वस्थ बसू देत नव्हते. न दिसणारा विषाणू आपली ताकद आजमावू पाहत आहे, यावर विश्वास बसत नव्हता. कोरोना व्हायरसच्या या वाढत्या प्रभावामुळे जगभर थैमान माजलंय. हजारो प्राण जाताहेत. सोशल डिस्टन्सिंग ओळखून भारत देशातील सर्व कारखाने , कार्यालये, वाहतूक ,कंपनी आणि आपलशी वाटणारी लाल परी ही बंद झाली. सांगली ते नांदेड जाणारी लाल परी ही बंद घरी कसा जाणार अन् सुरू झाला कोरोनाशी लढा..
ऊसतोडणी मजुरांची मुले : दुष्काळ हा पाचवीला पूजलेला,उजाड अश्या माळरानावर असलेली ही वस्ती द्विशिक्षकी शाळा आहे.बहुतांशी पालक सहा महिने ऊसतोडणीला जातात.उपस्थितीचा मोठा प्रश्न आहे. मुलांना शाळेची गोडी लावून शिक्षणाच्या प्रवाहात आणून आयएसओ मानकंन मिळविले आहेत .ऊस तोडणीला गेलेले मुलांचे आई वडील घरी आले असतील ना? ज्या मुलांचे आई वडील घरी ऊस तोडणीवर आले नाहीत त्या मुलांना जेवण केले असतील का ? सर्व शाळा ,कॉलेज ,महाविद्यालये कुलूपबंद पाहून मनाच्या विचार पटलावर अनेक शंकाकुशंका विराजमान आहेत. मुलांनी अभ्यासाला लॉक केले नसेल ना? मुलांना शाळेचा विसर तर पडणार नाही ना? घेतलेले ज्ञान विसरणार तर नाहीत ना? त्यांच्या मनात घराबाहेर पडण्याची भीती तर नाही ना? शाळा सुरू झाल्यानंतर मुले शाळेत येतील ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे. शासनाने दिलेली ही सुट्टी नसून आपल्या हितासाठी, आपल्या जीवासाठी, कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी घरी सुरक्षित राहण्याचे आदेश शासनाने दिलेला आहे हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.
कसेबसे काही दिवस गेले अन आणि काही दिवसांनी मुलांच्या घरी जावून तांदूळ व धान्ये वाटपचे शासन आदेश आले आणि मन आनंदून गेले. किमान या निमित्ताने तरी माझ्या मुलांची भेट होईल म्हणून प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन तांदूळ व धान्ये वाटप करते वेळी मुले पाहत होतो. मन भरुन येत होतं. ज्या मुलांचे आई वडील बाहेर गेले आहेत त्यांच्या पोटापाण्याचा विचार कोण करणार होतं ? आम्ही केलेली मदत किती काळ पुरणार होती.? पाहून मन अगदी सुन्न होत होतं.
शाळेबद्दल आवड व शिकण्याची जिद्द असणारी मुले गप्प कशी बसतील?शाळा कधी सुरू होणार? घरी बसून कंटाळा आलाय. आम्ही अभ्यास कसा करायचा? आमच्या परीक्षा कधी होणार? त्यांच्या या निरागस प्रश्नांसाठी मी निरुत्तर होतो. कारण हे कोरोनाचं भयाण संकट केव्हा दूर होईल, अन् शाळा कधी सुरू होईल याची शाश्वती नव्हती.
पण या मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवले तर त्यांचा कंटाळा निघून जाईल व अभ्यास देखील होईल, हा विचार मनात आला अन् लॉकडाऊन मध्ये ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रम सुचला. या उपक्रमाचे स्वरूप म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप करून त्यांना दररोज ग्रुपच्या माध्यमातून अथवा वैयक्तिक मेसेज पाठवून प्रत्येक इयत्तेचा अभ्यास पाठवायचा.
सर्व शैक्षणिक साहित्य सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेले आहे.SCERT तर्फे ‘शाळा बंद..पण शिक्षण आहे’ ही अभ्यासमाला नियमित सुरू आहे. ,जिल्हा परिषद सांगली देखील विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन स्वयंमूल्यमापन चाचणी’ हा अभिनव प्रयोग राबवत आहे. हे सर्व शैक्षणिक ज्ञानभांडार नेहमी विद्यार्थ्यांपर्यंत पाठवले तर शिक्षण प्रक्रिया ही लॉकडाऊन मध्ये देखील निरंतर सुरु राहील ही शाश्वती होती.
अभ्यास ऑनलाईन अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप तयार केले व व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करत राहिलो. एक खंत याच गोष्टीची होती की,ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्मार्टफोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमापासून अलिप्त व्हावे लागत होते. पण अशा विद्यार्थ्यांना बाजूच्या घरी फोन करून, एकमेकांच्या घरी निरोप देऊन अभ्यास काय काय करायचा हे सांगण्यात आले व त्यांनाही या प्रक्रियेत सामील करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची सध्याची मानसिकता काय असेल हे ओळखणे कठीण आहे.
खरी परीक्षा ही कोरोनाविरुद्ध लढण्याची आहे. प्रयत्न हाच आहे की, शिक्षण ही प्रक्रिया निरंतर सुरू राहावी, त्यात खंड न पडता सातत्य रहावे. यासाठी आपले शासन,आपली जिल्हा परिषद सर्वच स्तरावरून ‘लर्निंग फ्रॉम होम’ च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.
अजूनही मुलांची नाळ ही शाळेशी इतकी जोडली आहे. की बाबरवस्तीवर असणारी आजी माजी विद्यार्थी अजूनही शाळेसाठी झटत असतात. पंख फुटलेली पाखरं जशी उडायला शिकली म्हणून घरटी विसरत नाहीत तशी मुलेही शाळेविषयी कृतज्ञ आहेत. त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा काम करण्याच बळ देतो पण सध्या लॉक डाऊन स्थितीत घरी राहूनच आपले व आपल्या कुटुंबाचे हित जपणे महत्वाचे त्यातूनच कुटुंबातील सदस्य व्यक्ती यांच्या विषयी आत्मीयता व त्यांच्या अनुभव कथेतून सुजाण व आदर्श नागरिक निर्माण होतील.
घरी राहा,सुरक्षित राहा!!!
लेख–
दिलीप मारोती वाघमारे
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.मराठी शाळा बाबरवस्ती (पांडोझरी) ता.जत, जि.सांगली
मो.9881142113