जत,प्रतिनिधी : सर्वांना घरकुल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे जत तालुक्यात रखडली असून, राज्य शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.जत तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा जवळ आला असताना अर्धवट स्थितीतील घरे कधी पूर्ण होणार अशा गंभीर अवस्थेत लाभार्थींसमोर पेच निर्माण झाला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपला आहे. राज्यात घरकुलाचा निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थींच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल, असे शासन स्तरावर सांगण्यात येत आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला असताना आहे त्या स्थितीतल्या घराची मोडतोड करून अर्धवट स्थितीतल्या घरामुळे लाभार्थींचे हाल झाले आहेत. परिणामी बेघर होण्याची वेळ लाभार्थींवर ओढवली आहे.
दुसऱ्याच हप्त्याला एवढा वेळ तर तिसरा, चौथा कधी मिळणार? आणि आमचे घरकुल पूर्ण कधी होणार या चिंतेत लाभार्थी आहेत. घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने पाया बांधून हप्त्याची वाट बघावी लागते आहे. यावर्षी तरी घर पूर्ण होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत लाभार्थींना पहिल्या हप्त्यात घरकुलाच्या पायाचे बांधकाम करून ठेवले आहे. मात्र तीन महिने उलटूनही लाभार्थींना घरकुलाचे हप्ते वेळेत मिळत नसल्याने तालुक्यातील घरकूल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.