जत | आईची भेट न झाल्याने मुलाची आत्महत्या
जत,प्रतिनिधी : लॉकडाऊनमुळे आईची भेट न झाल्याने 15 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी रत्नागिरी येथे घडली.प्रशांत भाऊसो थोरात (वय 15,रा.रत्नागिरी, मुळ गाव बाज) असे त्याचे नाव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. त्यासाठी परवानगी व नियम अटी लागू आहेत.जत तालुक्यातील बाज येथील थोरात कुटुंबीय रत्नागिरी येथे कामानिमित्त राहावयास आहेत.
वडील रत्नागिरी येथे वास्तव्यास आहेत तर आई बाज येथे राहवयास आहे. रत्नागिरी येथे राहणाऱ्या मुलाला घरी जाण्याची ओढ लागली होती. तो वडिलांना वारंवार सांगत होता मला आईकडे घेऊन चला,परंतू लॉकडाऊनमुळे जाणे शक्य नव्हते. दरम्यान, वडील अत्यावश्यक सेवेसाठी ट्रक चालक म्हणून कामाला गेले होते. दरम्यान वडिलांनी जत येथे जाण्यासाठी गाडीची चौकशी केली होती, परंतु त्या अगोदरच प्रंशातने गळफास लावून घेतला.यामुळे वडिलांनाही धक्का बसला. यानंतर मुलाचा मृतदेह मुळ गावी बाज येथे आणण्यात आला.शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद रत्नागिरी पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.