थेट परदेशी गुंतवणूक व उद्योगांना आकर्षित करणारे राज्याचे पॅकेज देण्यास दिरंगाई का ? | भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई ; थेट परकीय गुंतवणूक व उद्योग यावेत म्हणून महाराष्ट्राने उपलब्ध जमीन, दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, सेवा सुविधांचे पॅकेज विलंब न करता तातडीने जाहीर करावे..आपल्या दिरंगाईने महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून या कामी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, या कामी दिरंगाई का होतेय? अन्य राज्य कोरोनाच्या युध्दात असतानाच या आघाडीवर ही युध्द पातळीवर काम करित आहेत, अशा वेळी आपल्या दिरंगाईची कारणे काय? याकडे लक्ष वेधत भाजपा नेते, माजी मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
भारत सरकार विविध राज्य सरकारांसह येणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी, उद्योग स्थापन करण्यासाठी तयार लँड बँक विकसित करण्याच्या कामात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 1000 हून अधिक अमेरिकन कंपन्या आणि सुमारे 300 जपानी व कोरियन कंपन्यांनी चीनबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अशा गुंतवणूकदार आणि कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, फार्मास्यूटिकल्स, रसायने, खते, वैद्यकीय उपकरणे, अवजड उद्योग, इंजिनीअरिंग, सौर उपकरणे आणि फूड प्रोसेसिंग यासारख्या क्षेत्रांना यापूर्वी प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत जीडीपीच्या 15% वरून 25% पर्यंत उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सुसज्ज आहे का? महाराष्ट्राला या कामी विलंब तर होत नाही ना? महाराष्ट्र शासनाने या कामात विलंब केल्यास, महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, म्हणून तळमळीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या शासनाचे लक्ष वेधत आहेत. दोन दिवसांपूर्वी या विषयातील काही मुद्दे लक्षात आणुन दिले होते आज पुन्हा दुसरे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र हा नैसर्गिक साधनानी समृद्ध असा प्रदेश आहे. महाराष्ट्र हा उद्योगांना नेहमीच प्रथम पसंतीचे राज्य राहिले आहे. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी, लँड बँक, पायाभूत सुविधा, पाणी, वीज व मानव संसाधन, कुशल मनुष्यबळ या सगळ्यांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने एक आकर्षक पँकेज तयार करुन त्याचे आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसार, प्रचार करावा. त्यासाठी स्वतंत्र तज्ञ यंत्रणा उभी करावी अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.