जत,प्रतिनिधी : कर्नाटक राज्यातून जत तालुक्यात आजपर्यंत एक हजार 237 नागरिक आले असून, मागील चार दिवसांत 111 नागरिक आलेले आहेत,
तर फक्त विजयपूर येथून जत तालुक्यात 80 नागरिक आले आहेत.विजयपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने कर्नाटकातून येत असलेल्या लोकांमुळे जत तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जत तालुक्यातील दैनंदिन व्यवहार विजयपूर जिल्ह्याशी संबंधित आहेत. त्यामुळे विजयपूर येथून मागील चार दिवसांत येळवी, वळसंग, संख, कोंत्येवबोबलाद, जत व रेवनाळ या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. या सर्वाना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने शिक्के मारले आहेत.याशिवाय रेवनाळ (ता. जत) येथे आलेल्या दोन नागरिकांना संशयावरुन मूकबधिर प्रवाशाला जत येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
विजयपूर जिल्ह्यातून जत तालुक्यात व जत शहरात किराणा भुसार माल व त्यासोबत काही नागरिकांना येथील व्यापारी घेऊन आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधित दुकानदाराचे दुकान व गोडावून सील करून घरातील सर्वच नागरिकांना होम क्यारंटाईन करण्याचे आदेश तहसीलदार सचिन पाटील यांनी दिले आहेत.विजयपूर येथून जत शहरात
येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.तरीही नागरिक आडमार्गाने येतच आहेत.विजयपूर ते गुहागर राज्य मार्गावर असणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना जत शहरात आणि तालुक्यात प्रवेश द्यावा अन्यथा देऊ नये, अशी मागणी जत नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार यांनी केली आहे.