जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीत पुन्हा कमळ फुलले.सभापतीपदी भाजपचे मनोज विलासराव जगताप तर उपसभापतीपदी विष्णू बंजरग चव्हाण विजयी झाले.भाजपला 10 तर काँग्रेस उमेदवारांना 7 मते मिळाली. चुरसीने झालेल्या निवडीत कॉग्रेसचे रविंद्र सांवत व भाजपच्याच बंडखोर कविता खोत यांना प्रत्येकी 7 मते पडली.कॉग्रेसच्या अश्विनी चव्हाण या सदस्या गैरहजर राहिल्या.
पं. स. सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी, प्रांताधिकारी प्रंशात आवटे व सहाय्यक अधिकारी तथा गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडली.निवडीनंतर सभापती जगताप व उपसभापती चव्हाण यांचा प्रातांधिकारी प्रंशात आवटे व अरविंद धरणगुतीकर यांनी सत्कार केला.कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण,फटक्याची आतिषबाजीत केली.पंचायत समिती कार्यालय ते शिवाजी चौकापर्यत रँली काढण्यात आली.
पंचायत समितीच्या दुसऱ्या अडीच वर्षासाठी सभापती, उपसभापतीची निवडीची घोषणा झाल्यापासून वातावरण तापले होते. विधानसभा निवडणूकीपुर्वी फुटलेला माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट पुन्हा या निवडणूकीत एकत्रित दिसला.भाजपच्या संख येथील एक सदस्या कविता कांताप्पा खोत यांनी बंड करित कॉग्रेसकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. तर कॉग्रेसच्या सदस्या अश्विनी चव्हाण या गैरहजर राहिल्या.बहुमतासाठी सदस्य संख्या एकने कमी झाली.भाजपचे खोत वगळता सर्व सदस्य एकसंघ राहिले. तर वसंतदादा विकास आघाडीचे शिवाजी शिंदे व जनसुराज्यचे अँड.घेरडे यांनी शब्द पाळला.ते दोघेही भाजपसोबत राहिल्याने भाजपला बहुमताचा आकडा राखता आला.कॉग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार रविंद्र सांवत व उपसभापतीपदाचे उमेदवार कविता खोत यांना प्रत्येकी सात मते मिळाली.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,माजी सभापती बिराजदार,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीत दुंभगलेले भाजपा नेते एकत्र
गत विधानसभा निवडणूकीत भाजपपासून फारकत घेतलेले बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि प शिक्षण सभापती तम्मणगौडा रवीपाटील हे भाजपसोबत राहिले. त्यामुळे भाजपची ताकत वाढली. त्यामुळे भाजपला सत्ता कायम राखण्यात यश मिळाले.तर काँग्रेसचा प्रयोग अपयशी ठरला.
विकासासाठी काम करू : जगताप,चव्हाण
जत पंचायत समितीच्या सभापती पदी मिळालेल्या संधीचे सोने करत,तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजना पोहचवत विकास करू,नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आमचे कायम प्रयत्न राहतील असे सभापती मनोज जगताप व उपसभापती विष्णू चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
असे झाले मतदान
माजी सभापती सौ.मंगल जमदाडे,सुशिला तांवशी,श्रीदेवी जावीर,लक्ष्मी माळी,सुप्रिया सोन्नूर,रामाण्णा जिवाण्णावर,अँड.आडव्याप्पा घेरडे(जनसुराज्य),शिवाजी शिंदे(अपक्ष) यांनी भाजपला तर दिग्विजय चव्हाण,आप्पा मासाळ,धऱ्याप्पा हत्तळी,अर्चना पाटील,सौ.लता कुळ्ळोली यांनी कॉग्रेसला मतदान केले.
जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सभापती मनोज जगताप यांचा प्रातांधिकारी प्रंशात आवटे व सर्व सदस्यांनी सत्कार केला.यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुतीकर, उपसभापती विष्णु चव्हाण उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.