महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे आंदोलन ; धरेप्पा उर्फ बाळू कट्टीमनी

0

जत,प्रतिनिधी : शैक्षणिक सत्राचे शेवटचे तीन-चार महिने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. याच महिन्यात नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असतात. शालेय स्नेहसंमेलन, विद्यार्थ्यांच्या केंद्र स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन असे एक ना अनेक विद्यार्थी हितैशी नियोजित कार्यक्रम या तीन महिन्यात होत असतात. सोबतच मूल्यमापन चाचण्याही असतातच. यावर्षी दशवार्षिक जनगणना जानेवारी महिन्यापासून नियोजित आहे. 

मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षण हिताशी प्रतारणा करण्याचा व सामान्यजनांच्या पाल्यांना शैक्षणिक दृष्ट्या मागे ठेवण्याचा वीडा उचलल्यागत शिक्षण विभागाची राज्यस्तरीय यंत्रणा या तीन महिन्यातच नेहमीप्रमाणे प्रशिक्षणाचा भलामोठा उपद्रवी कार्यक्रम राबवत असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. शिक्षक संघटनांनी या संबंधाने अनेकदा शासनासोबत चर्चा करून प्रशिक्षण दिवाळीपूर्वी पहिल्या सत्रात शालेय कामकाजाच्या वेळेतच घ्यावेत अशी भूमिका मांडली आहे. मात्र प्रशिक्षण कार्यक्रम जानेवारी महिन्या पासून घेण्यातच शासनाचे संबंधित विभाग आग्रही असतात हे वारंवार घडत आहे. शेवटच्या तीन महिन्यात शिक्षकांनी प्रशिक्षणाला जावे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या आणि सहशालेय उपक्रमाच्या दृष्टीने नेमके काय करावे याची मोठी त्रेधातिरपीट निर्माण होते.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या संबंधाने बोलणाऱ्या प्रशासनिक यंत्रणेला, पैसे कमावणाऱ्या त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून गुणवत्तेचे सर्वेक्षण करून शिक्षक समाजाची नाहक बदनामी करणाऱ्या अहवाला आधारित कागदोपत्री उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासले जाणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. मात्र यासाठी वेळोवेळी शिक्षकांच्या संबंधाने गरळ ओकणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांना शिक्षकांची ची स ससेहोलपट दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि हेच तथाकथित शिक्षण तज्ञ गुणवत्तेच्या संबंधाने केवळ शिक्षकांना जबाबदार धरतात मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ब्र काढत नाही.त्यासाठीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने 4 जानेवारी  2020 रोजी प्रत्येक जिल्हा परिषदेसमोर धरणे निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे जत तालुका शिक्षक समितीचे नेते धरेप्पा उर्फ बाळू कट्टीमनी यांनी सांगितले आहे.

Rate Card


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.