जत नगरपालिकेपुढे मोकाट जनावरांचे आव्हान भररस्त्यावर ठिय्या :कुत्र्यांच्या झुंडीमुळे नागरिक भयभीत

0
9

जत,( प्रतिनिधी) :शहरात वाढत चाललेली गावरान व रानटी भटक्या कुत्र्यांची संख्या, झुंडीने आणि कळपाने फिरत असलेली डुकरं, मोकाट जनावरे आदींमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नगरपालिकेपुढे आहे.दरम्यान मोकाट जनावरे पकडण्याचे पालिकेकडून टेंडर काढण्यात आले,मात्र त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात आहे.
शहरात गावरानी व रानटी कुत्र्यांची टोळी दिवसरात्र सर्वत्र फिरतात.  रात्र-रात्र कुत्र्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड होते. त्यामुळे त्यांना विविध शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. शहरात बालवाडी, अंगणवाडी, कॉन्व्हेंट आदींमध्ये लहान मुले एकेकटे जातात. त्यांचे पालकसुद्धा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने चिंताग्रस्त राहात आहे.
झुंडी व कळपाने फिरणारे डुक्कर चौकाचौकातील कचरा पसरवितात, नाल्यात हुंदडतात, नागरिकांच्या घरातही घुसतात. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात विविध रोगराई वाढण्याची भीती आहे. मोकाट जनावरांमुळे त्यांच्या रस्त्यात, चौकात ठाण मांडण्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासह शहरातील स्वच्छतेवर विपरित परिणाम होण्यासह विविध प्रश्न निर्माण झाले आहे.
मोकाट जनावरांना खुराक वरचेवर मिळवून देवून शहरातील काही महाभाग त्यांना पोसत आहे. वरून अस्वच्छता, घाण, कचरा शहराच्या शाळा परिसरासह विविध भागात टाकून वातावरण प्रदूषित करीत आहे. अशा लोकांचा शोध घेऊन शहर स्वच्छ ठेवणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. गेली साडेतीन वर्षांपासून नागरिकाना याबाबत कार्यवाहीची प्रतीक्षा करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे.जत नगरपालिकेमध्ये त्याची चांगली अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. आगामी काळात गणपती, दुर्गादेवी, दिवाळी आदी सर्वमहत्त्वाचे सण आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच नगरपंचायतीने कामी लागणे आवश्यक आहे. जत तालुका आणि उपविभागाची उदयोन्मुख आणि विकासान्मुख प्रतिमा आहे. या प्रतिमेची जपणूक करण्याचे आव्हान नगरपालिकेपुढे आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here