निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा | रोषणाईचा मांडलेला निर्जिव, ढोंगी साज. कितपत योग्य आहे ? |

0
Rate Card

॥ वक्रतुण्ड महाकाय सुर्य कोटी समप्रभः ॥ 

॥ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥

     गणराया, आपले आगमन सर्वांना हवेहवेसे आणि अबालवृद्धांना सुखद वाटणारे आहे हे मी किंवा कुणी दुसऱ्यानी सांगायची गरज नाही. इथली सध्याची हालहवा तू दरवर्षी अनुभवतो आहेसच. बोंबल्यांच्या ठणाण्याच्या साथीत अलिकडे काही काळापासून डॉल्बीचा हादरा तू सोसतो आहेस हे माझ्यासकट सगळ्यांनाच माहीत आहे.  त्याचसोबत तरुणाई आणि त्यांच्यासवे इतरांचाही सैराट होऊन ‘झिंग झिंग झिंगाट’ म्हणा किंवा ‘शांताबाई’ चा ठेका धरत त्या तालावर कमरा लचकवत पावलांचा चाललेला दणाणा अनुभवत आहेस. ‘पोरी तुझा झगा ग ‘ सारखी हिडीस गाणीही कळस गाठत आहेत. या परिस्थितीतमुळे सांस्कृतिक वातावरणाला ओंगळ रूप येत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच पण धुरामुळे हवेचे प्रदूषण झाल्याने दम्यासारख्या कायमस्वरुपी आजारांचेही प्रमाण वाढते आहे.  बोंबल्या उर्फ लाऊडस्पीकर, डॉल्बी, फटाके, ढोल, ताशे सह अनेक कर्णकर्कश्य आवाजांचा लहान बालके, मुले, रुग्ण, वृद्ध इतकेच काय धडधाकट माणसांना देखील त्रास सहन करावा लागतोच आहे; शिवाय दूरगामी श्रवणदोष आणि अनेक मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन, लोकप्रबोधनासाठी तुझ्या सुरु केलेल्या उत्सवाला त्याचा मुळचा बाज बदलून कुठं नेऊन ठेवलंय आम्ही आज ! बघतोयस ना ? हे पाहून तुही अंतःकरणात निराश असणारच हे जाणतो आम्ही. बऱ्याच वेळा बोलूनही दाखवतो. असं न व्हावे हेही वाटते; पण हे होत नाही. सध्याच्या महागाई वाढून कहर झालेल्या आणि काटकसरीची निकड असलेल्या काळात आरास आणि रोषणाईचा मांडलेला निर्जिव, ढोंगी साज. कितपत योग्य आहे ? विजेच्या भारनियमनाच्या परिस्थितीत आजची 24/24 तास औचित्याविना चाललेली वीजेची पाण्यासारखी उधळपट्टी ! काय बोध घ्यायचा यातून ? गणेशा, सध्याच्या भयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीही महागलंय भलतंच बरं सध्या. पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे आणि भविष्यकालीन काळात जास्तच होणार आहे. केवळ रिवाज आहे आणि नवा शब्द सापडत नाही म्हणून वरील वाक्प्रचारात नावापुरतं पाणी वापरलंय इतकच ! नाहीतर पाण्याचा खडाडाच आहे जवळजवळ सारीकडे. असो.स्पर्धा, चढाओढी, इर्शा यातून अनेक गैरप्रकार वाढत आहेत. उत्सवाच्या नावाखाली भरमसाठ वर्गणी उकळण्याचे प्रकारही बऱ्याच ठिकाणी होत आहेत. त्याचा सामान्याना फटका बसतो आहे. सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. मुर्ती विसर्जनामुळे नदी, ओढे, विहिरी, तलाव, समुद्र इत्यादी पाणीसाठे दुषीत होत आहेत. अनेक वर्षे साठत जाणाऱ्या माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या विषारी पदार्थांमुळे पाणीसाठे दुषीत होत आहेत. वाढणाऱ्या गाळामुळे उथळ होऊन आटत आहेत किंवा त्यांचा मार्ग बदलण्याचा धोका निर्माण होत आहे. मुर्तींना वापरलेल्या रासायनिक रंगामुळे पाण्यातील जलचर, पाणवनस्पती तसेच इतर बाहेरच्या सजीवांचे जीवनसुद्धा धोक्यात आले आहे. मानवांवरही याचा अनिष्ठ परिणाम जाणवत आहे. मुर्तीविसर्जनाबरोबरच फुले, दुर्वा, पत्री, माळा वगैरेसारख्या निर्माल्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. ते पाण्यात विसर्जनामुळे पाणीस्त्रोत दुषीत होत आहेत. निसर्गाची जीवनसाखळीच कात्रीत सापडू पहात आहे.

आणखी बरंच काही तू पहातो आहेस, ऐकतो आहेस. गणेशा, हे सारं ऐकून, बघून तू स्वतः देव असून सुद्धा तुझ्यावर पाळी आलीय ‘अरे देवा’ म्हणत डोकं धरुन बसायची ! पण गणपतीबाप्पा, अजूनही वेळ गेलेली नाही. यातून सावरण्याची, सुधारण्याची दिशा दे आम्हाला. इको फ्रेंडली शाडू मातीच्या मुर्ती, नैसर्गिक फुले, सजावटीचे नैसर्गिक साहित्य वापरुन मंगलमय भक्तिगितांसह, प्रमाणात मर्यादित आवाज ठेऊन हा उत्सव साजरा करुन तसेच मुर्ती आणि निर्माल्य विसर्जन ठराविक ठिकाणी करुन ध्वनी, जल, पर्यावरण प्रदूषण, संपत्ती, इंधनाचा अवाजवी विध्वंस थांबवण्याची सुबुद्धी दे. तू आम्हां साऱ्यांचा जीव की प्राण आहेस. तुझा उत्सव आनंद, जल्लोषात व्हावा यात गैर काहीच नाही. पण या उत्सवाला सोज्वळ, पवित्र, साधे, विवेकाचे रूप यावे. लोकप्रबोधनासाठी, जागृतीसाठी या उत्सवाचा उपयोग व्हावा. स्नेह, प्रेम, बंधुता, सहकार्य वृद्धीची प्रत्येकाला सुबुद्धी दे हेच तुजपुढे आता आणि पुढील वर्षांसाठीही आतापासूनच साकडे !! आणि देवा गणराया, तुजपाशी ——

” बाप्पा गणराया आता तुझे येणे आनंदाचे गाणे आम्हांसाठी..!पितांबर धारी गोड तुझे रुप आम्हां सुखरुप ठेव आता ..!सुख दुःख विद्या तुझ्याच रे हाती आम्हांठायी प्रितीठेव बाप्पा ..!पार्वतिच्या बाळा मंगल तू मुर्ती दिगंत रे किर्ती वक्रतुण्डा..!आम्ही सारे भक्त तुझे रे गणेशा आम्हां दे रे दिशा विकासाची ..!! “हेच या समयी आग्रहाचे मागणे. । गणपतीबाप्पा मोरया ।, । मंगलमुर्ती मोरया ।

                 – महादेव बी. बुरुटे ,

                   Mob- 9765374805 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.