दि. 8/8/19 रोजी संध्याकाळी एक 17-18 वर्षाचा मुलगा माझ्या दवाखान्यात आला. “मला काय झालंय मला सांगता येत नाही. तुम्हीच मला तपासून काय झालंय ते बघा आणि त्याप्रमाणे औषध द्या.पण मला नीट करा.” असं तो म्हणाला. त्याच्या बरोबर आलेली मुले हसायला लागली. पण मला काहीतरी वेगळे वाटले. कारण एकतर तो मुलगा मला नविन होता… आणि अनोळखी मुलगा एकदम अशा भाषेत मला तक्रार सांगणार नाही हे मला पक्के ठाऊक होते. म्हणून मी त्याला विश्वासात घेऊन तक्रार परत विचारली तर एक भयाण सत्य सामोरे आलं..
गेले 15 दिवस पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय. सांगली आणि कोल्हापूरातील पुरपरिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत गेली. माझं गाव सांगली जिल्ह्यातील इनाम धामणी,मी गेली 21 वर्षापासून या गावात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. माझं गावही पुराच्या तडाख्यात सापडलंय.गावाजवळ नदीला चिकटून असणारी जुनी धामणी व बामणी ही गावं मात्र महापुराने अखंड गिळंकृत केली आहेत.2005 चा महापुर ज्यांनी बघितलाय.त्यांना 2019 च्या महापुराची भीषणता जास्त माहीत आहे.तेव्हांही जुनी धामणी हे गाव पुरामध्ये बुडाले होते. त्यावेळी प्रथमच एवढा पूर आल्यामुळे ते संपूर्ण गाव आमच्या इनाम धामणी मध्ये स्थलांतरीत झाले होते. पण पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थ ज्यावेळी परत आपल्या घरी गेले,त्यावेळी पूरामुळे तर त्यांचे नुकसान झालेच होते.शिवाय पूराचा फायदा घेऊन काही लुटारु टोळींनी प्रत्येकाची घरे फोडून घरातील मौल्यवान ऐवज लंपास केले होते. या वर्षीच्या उच्चांकी पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीने आयर्विन पुलावरील 45 फुटाची धोक्याची पातळी जशी ओलांडली,तशी आमची जुनी धामणी व बामणी मधील नागरिकांना महत्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. पण मागील पुराइतके पाणी येईल का ? किंवा मागील पुरावेळी घरात झालेली चोरी या गोष्टी ध्यानात ठेवून गावातील सुमारे 25 वर धाडसी तरुण व काही ज्येष्ठ पुरुष मंडळींनी तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच लोकांची जनावरे पण तिथेच होती. त्यांना रोज वैरण घालून जगवणे आणि स्वतः रोज भात आमटी करुन खाऊन जगणे, असा रोजचा दिनक्रम चालू झाला. इकडे पाणीपातळी हळूहळू वाढतच होती पण अजून मोबाईल टिव्ही व इंटरनेट यांच्या सहाय्याने सगळी खबरबात कळत होती आणि वेळ पण सहज जात होता.
पण फक्त एवढंच नियतीला मान्य नव्हते. पाणीपातळी नंतर झपाट्याने वाढू लागली. अखंड गाव पुराच्या कवेत आलं. चहूबाजूने पाण्याचा फास आवळण्यात आला. सर्वांनी आपापले महत्त्वाचे साहित्य पहिल्या मजल्यावर ठेवायला सुरुवात केली. या जिगरबाज पोरांनी फक्त साहित्यच नाही तर जनावरे पण पहिल्या मजल्यावर आणून बांधली.कशी वर आणली, देव जाणे.सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून गावाचे मंगळवारी गावाचं लाईट कनेक्शन बंद करण्यात आले. मग सगळेच वांदे सुरु झाले. मोबाईलची बँटरी किती वेळ टिकणार ? आता पुन्हा चार्जिंग पण लगेच होणार नव्हते. दिवस कसाबसा गेला. पण आता रात्रीचं काय.?
सगळीकडे काळाकुट्ट अंधार, कान कर्कश्श करणारे किड्यांचे आवाज.. त्यात नदीच्या पाण्याचा आवाज. आता मात्र भीती वाटायला लागली.पाण्यात वळवळणारे नाग साप आसऱ्यासाठी घरात शिरु लागले होते. सगळ्यांनीच डोळ्यात तेल घालून रात्र जागून काढली.
सगळेजणच जगापासून दूर अशा जगात गेले. गच्चीवर जाऊन कुठेही बघितलं तरी त्यांना महापुराचा रुद्रावतार पहायला मिळत होता. जनावरांची अवस्था पण बघवत नव्हती. स्वतःच्या घराची पडझड डोळ्यांसमोर होत होती.पण काहीच करु शकत नाही अशी हतबल अवस्था होती. परिस्थितीवर मात करु शकणाऱ्या मुलांनी आता मात्र परिस्थितीसमोर हात टेकले होते.
एका बोटीच्या सहाय्याने 15 चा ग्रुप करत सर्वांची सुखरूप सुटका केली. त्यातील प्रत्येकजण भेदरलेल्या अवस्थेत होता. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटून आपल्या माणसांत परतल्यावर बऱ्याच जणांचे अश्रूंचे बांध फुटले होते.
प्रांरभी माझ्या दवाखान्यातील त्या मुलाबाबत मी बोललो ना… हा त्यातीलच एकजण होता. त्याची जनावरे मरणासन्न अवस्थेत सोडून आल्याची त्याला खंत होती. त्याच्या घराचे झालेले नुकसान त्याला आठवत होते. पाण्यातून घरात आलेले 3 साप त्याच्या डोळ्यांसमोर वळवळत होते. मला तक्रार सांगताना प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होता. प्रचंड भेदरलेल्या मनस्थितीत होता तो.सर्वप्रथम त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन मी त्याला प्रचंड धीर दिला. त्याला औषधे देऊन माझ्या दवाखान्यात थोडा वेळ थांबवून परत पाठवले.तो मुलगा दवाखान्यातून बाहेर पडला. पण त्याने कथन केलेली पूरस्थिती माझ्या डोळ्यासमोर यायला लागली. बाप रे… किती भयानक होते ते सगळं.या तीन दिवसात या लोकांनी काय काय अनुभवलं होत.प्रत्यक्ष मृत्यूला ते सामोरे गेले होते.अशा वेळी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वागणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. या दरम्यान एक टोकाचा विरोधाभास मला दिसून आला. एकीकडे भेदरलेल्या अवस्थेत असणारे पूरग्रस्त आणि दुसरीकडे महापुर बघायला येणारे लोकांचे लोंढे. पूरग्रस्त लोकांच्या वेदना समजून न घेता पूरप्रविष्ठ भागाला जत्रेचे स्वरुप आणणाऱ्या लोकांची मला लाज वाटत होती. पूरग्रस्त लोक पावसात भिजत आपले जीवनोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी नेत होते.त्याचवेळी एका दुचाकीवरुन तिघेतिघे पूराची मजा लुटायला तरुणाई येत होती. त्यांना या संसार उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त लोकांशी काही देणेघेणे नव्हते. त्यांना फक्त फोटो काढायचे होते. खरंच लाज वाटत होती या सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या तरुणाईची.आईबापानी घेऊन दिलेल्या गाड्या. त्यांच्याच पैशाने त्यात पेट्रोल घालून ही टवाळखोर पोरं महापुराची मजा लुटत होती आणि पूरग्रस्त लोकांच्या जखमेवर जणुकाही मीठच चोळत होती.
अशा परिस्थितीत आमच्या गावातील तरुण पोरांनी याची दखल घेतली. या मस्तवाल पोरांना गावाबाहेरच अडवून त्यांना परत फिरायला भाग पाडलं. त्यामुळं गावातील लोकांना स्थलांतर करायला आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास वाट मिळाली. बरं एवढंच करुन ही पोरं गप्प बसली नाहीत. या पोरांनी आपापल्या घरात जास्तीचा स्वयंपाक करायला लावून पूरग्रस्त लोकांना अन्न पोचवण्याचे काम केले. पूरात अडकलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढताना असामान्य धाडस दाखवले. स्वतःच्या जीवावर उदार होणारी मुलं यावेळी मी बघितली. इतर वेळी पोरकट वाटणारी ही पोरं आता मला एकदमच प्रौढ झाल्यासारखी वाटू लागली. या पोरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा कोप लवकरच कमी होऊन सर्व पूरग्रस्तांना नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यास मानसिक बळ मिळो हीच मनोमन प्रार्थना..
डॉ.आनंद महादेवराव पोळ
इनाम धामणी,982268633