नागरिकांचा टाहो,जनावरांचे हाल,प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग
जत : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी 43 अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे स्रोत, अपूर्ण असलेल्या सिंचन योजना यामुळे जत तालुका उन्हाच्या आगीत आणि दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण तालुका टाहो फोडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अक्षरश: वण वण भटकत आहेत. तालुक्यात या परिसरातील 87
गावे 850 वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू असून, या सुरू असणाऱ्या खेपाही अपुऱ्या पडत आहेत. वाढीव खेपांची मागणी होऊ लागली आहे.दीड लाखावर लोकसंख्या पाण्याच्या टँकरवर तहान भागवत आहे.
तालुक्यात विहिरी, कूपनलिका, तलाव हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांची पाण्याची पातळी घटली आहे. सिंचन योजनांचे पाणी मृगजळ आहे. त्यामध्ये नियमित पणा नाही.मागणी असूनही कँनॉल मोकळे ठणठणीत आहेत.इतर ठिकाणी म्हैसाळ योजनेची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यातही अडचणी आहेत.
तालुक्यात दरवर्षीच पाणीटंचाई असते. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. टँकरने देण्यात येणारे पिण्याचे पाणी फक्त नागरिकांना दिले जाते. परंतु नागरिकांना या वाटणीला आलेल्या पाण्यातून स्वत:ची व जनावरांचीही तहान भागवावी लागत असल्याने, वाटण्यात येणारे टॅँकरचे पाणी पुरेसे होत नाही. त्यामुळे यावर्षी अधिकच पाणी मागणी वाढली आहे.
तालुक्यातील टंचाईची परिस्थिती कायमची हटवायची असेल, तर म्हैसाळ योजना कायमस्वरूपी व नियमित सुरू ठेवल्या पाहिजेत. पावसाचे पाणी अडवून ते जिरवले पाहिजे व भूजल पातळी वाढविण्यास मदत केली पाहिजे.