जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळी तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल.चारा छावणीसाठी तहसीलदार याच्यां अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सध्या चार प्रस्ताव आले आहेत.शासनाने चारा छावण्याच्या जाचक अटीमध्ये शितीलता आणली आहे. छावणी चालू करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जतेत दुष्काळ आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासमोर पाणी टंचाई,चारा छावणी,उपसाबंदीबाबत लोकप्रतिनिधी समस्याचा भडिमार केला.सध्या म्हैसाळचे पाणी तालुक्यातील पश्चिम भागात येऊनही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.कोसारी तलावातून रस्ते कामासाठी ठेकेदारांकडून बेसुमार पाणी उपसा केला जात आहे.आदी समस्या मांडण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,तालुक्यात गंभीर परिस्थिती आहे.103 टँकरद्वारे 86 गावे व 650 वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील सनमडी तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे.तेथून पुर्व भागातील गावांचे टँकर भरण्याचे नियोजन आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात शहरासाठी लागणारा पाणीसाठा आरक्षित करून टँकर भरले जातील.प्रशासन सतर्क आहे. कोणत्याही उपाययोजनात कमी पडणार नाही.दरम्यान बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी अंकलगी,सनमडी तलावाला भेट दिली.