माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. आजघडीला 51 वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने गावागावांमध्ये तंटे वाढले आहेत अनेक वेळा प्रकरण हातघाईवर येत असल्याचे सतत प्रकार घडत आहेत.तालूक्यातील जवळपास सर्वच गावातील पाणी स्ञोत अटल्याने संपूर्ण तालुक्यात पाण्याचा वणवा पेटला असून थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. शासकीय यंञणेद्वारे होत असलेला टँकर पाणीपुरवाठा कमी पडत असून टँकरच्या खेपांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जनतेमधून येत आहेत.गावात पाण्याचे टँकर आले की पाणी भरण्यासाठी गोंधळ व भांडणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली आहे.जत पंचायत समिती, महसूल प्रशासनाकडून चांगल़्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु मार्च महिन्यामध्येच उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या घरात जाऊ लागल्यामुळे अधिग्रहित केलेल्या जलस्ञोतांतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. यामुळे पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवसेनदिवस पाणी मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही गावात गाव भागात असणारी टंचाई आता वाड्यावस्तावर ही वाढू लागली आहे. पाणी पट्टा असणाऱ्या भागातीलही पाणी झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे पुढचे दोन महिने प्रशासनासह जनतेचेही दिव्यच असणार आहे.