जत,(प्रतिनिधी):गुड्डापूर येथे पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना व देवस्थानला पाण्याची टंचाई भासत आहे. दोन दिवसांत कार्तिक यात्रा सुरू होणार आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामपंचायतीने व देवस्थान ट्रस्टने पंधरा दिवसांपूर्वी टँकर मागणीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयास देऊनही अद्याप टँकर दिला नाही. त्यामुळे भाविकांनीच देवस्थानला मदतीचा हात दिला आहे.पाच भक्तांनी मोफत पाच टँकर दिले आहेत. आतापासूनच टँकरने भाविकांना पाणीपुरवठा करत आहेत. यात्राकाळापर्यंत म ोफत टँकरने पाणीपुरवठा करणार आहेत. त्यामुळे शासनाने दुर्लक्ष केले; पण भाविकांनी पाण्यासाठी मोफत पाण्याचा टँकर दिल्याने तूर्त पाणीटंचाई टळली आहे. गुड्डापूरमध्ये गेली एक महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने व देवस्थान ट्रस्टने तहसील कार्यालयास व गटविकास अधिकार्यांना टँकरची मागणी केली होती. परंतु महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गावात व देवस्थान ट्रस्टला पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गुड्डापूरमध्ये दानम्मादेवीची उद्यापासून (दि. 5) कार्तिक यात्रा सुरू होणार आहे. यावेळी यात्राकाळात महाराष्ट्र व कर्नाटकातून चार ते पाच लाख भाविक दानम्मादेवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. परिसरात पाणी नसल्यामुळे येथे देवस्थान कमिटीवर पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. पाणीटंचाई होऊ नये म्हणून देवस्थान कमिटी प्रयत्न करीत होती. यावेळी काही भक्तांनी स्वयंखर्चाने चार टँकर पाण्यासाठी दिले आहेत. सध्या अंकलगी व तिकोंडी येथून टँकरने पाणी आणले जाते. ते देवस्थानच्या विहिरीत पाणी सोडले जाते. तेथून नळाने गावात व भाविकांनी पाणीपुरवठा केला जात आहे. गुड्डापूरमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे दानम्मादेवीचे भक्त विजापूरचे आमदार सुनील पाटील, श्रीमंत कोरे, राजू गुड्डोडगी, शिवानंद गोब्बी, बसवराज कणकणवाडी या पाच भक्तांनी आतापासूनच टँकर दिला आहे. आता व यात्राकाळात आठ दिवस मोफत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे देवस्थान ट्रस्टला सांगितले आहेे.