जत,प्रतिनिधी: जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन वंसत कांबळे यांना 20 हजार रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.पोलीस ठाण्यातच लाच घेताना कांबळे यास जेरबंद केले.गेल्या चार वर्षांत लाचलुचपतच्या जाळ्यात जत पोलीस ठाण्याचे चार अधिकारी सापडले आहेत. त्यामुळे जत पोलीसांची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.गजानन कांबळे अनेक वर्षे जत पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.यांचा कारभार नेहमीच वादग्रस्त होता.त्यांच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.एका सोलर कंपनीने सौरउर्जा प्रकल्पाचे अनुदान देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली होती.सदरचा गुन्हा जत पोलीस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस निरिक्षक गजानन कांबळे यांच्याकडे होता.सदर गुन्ह्यात कारवाईसाठी कांबळे यांनी पन्नास हजार रूपयाची मागणी केली होती.तक्रारदारांने कांबळे यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती. लाच लुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता कांबळे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.लाचलुचपत विभागाचे उपायुक्त संदिप दिवान,अप्पर पोलीस उपायुक्त राजकुमार गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक राजेंद्र सांळुखे,संजय कलकुटकी,भास्कर भोरे,जिंतेद्र काळे,संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ,बाळासाहेब पवार,अविनाश सागर,यांच्या पथकाने मंगळवारी जत पोलीस ठाण्यात सापळा रचला.गजानन कांबळे यांने तक्रारदारांकडून पोलीस ठाण्यातच वीस हाजार रूपयाची लाच घेतली.त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.कांबळे यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांने लाच घेण्याचा हा तिसरा प्रकार आहे.तर मागील चार वर्षात जत पोलीस ठाण्याचे चार अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.यापुर्वी प्रशिक्षणार्थी सिमा आघाव,सा.पोलीस निरिक्षक शेख,उपनिरिक्ष विजय घाडगे हे लाच घेताना रंगेहाथ सापडले होते.कांबळे हे चौथे अधिकारी आहेत.जत पोलीस ठाण्यातील लाचखोरी हा सध्या चर्चेचा विषय आहे.पोलीस ठाण्यातील अनखी दोन अधिकारी लाच लुचपत विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बऱ्याच दिवसानंतर लाचलुचपत विभागाने केेलेल्या कारवाईने खळबंळ उडाली आहे.तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात लाच हा महत्वाचा विषय ठरला आहे.कोणत्याही कामासाठी लाच दिल्याशिवाय काम होत नसल्याचे आरोप होत आहेत. मंगळवारच्या कारवाईने अशा लाचखोरांना धास्ती बसणार आहे.