जत,प्रतिनिधी : गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले.त्यामुळे जत तालुक्यात शुक्रवार पासून दुधसंकलन पुर्वरत झाले आहे. चार दिवसापासून दुधाचे रस्त्यावर पाट वाहिले,काही ठिकाणी शाळा व शेजार पाजाऱ्यांना दुध वाटप उत्पादकांने केले.दुध बंदने मोठ्या अडचणी झाल्या होत्या.शासनाने 25 रुपये लिटर दर जाहीर केल्याने दुध डेअऱ्या पुन्हा खोलल्या आहेत.तर दरवाढीने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.
आंदोलनामुळे शेट्टी यांचे नेतृत्व राज्यभरात भक्कम होण्यास मदत झाली. शेट्टी यांनी घेतलेला लढा शेतकऱ्यांना काहीतरी मिळवून दिल्याशिवाय संपत नाही या महत्त्वाचा धडाही या आंदोलनातून महाराष्ट्राला दिला गेला.
पाण्याच्या बाटलीपेक्षा स्वस्त दूध झाले होते, त्याला नव्या निर्णयाने किमान थोडा दिलासा मिळाला आहे. गायीच्या दुधास सरसकट 5 रुपये अनुदान द्या, अशी एकच मुख्य मागणी घेऊन शेट्टी यांनी या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यासाठी मुंबईचे दूध तोडण्याचे आंदोलन त्यांनी पुकारले होते. दिवस पावसाळ्याचे होते. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होता तरीही त्यांनी हे आंदोलन पुकारून व ते तितक्याच तिरमिरीत यशस्वी करून दाखविले.आपण या प्रश्नांत सहानुभूतीने निर्णय न घेतल्यास भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे असा मॅसेज लोकांत जाईल व तो आगामी लोकसभेच्या निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल, असे वाटल्यानेच मग सरकारने प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावले टाकली.लिटरला 5 रुपये दरवाढ देतानाही सरकारने त्यात एक चांगली मेख मारून ठेवली आहे. जे खासगी दूध संघ नुसती दूध भुकटी करतात त्यांना सरकार देणार असलेल्या 5 रुपये अनुदानाचा लाभ होणार नाही. जे भुकटी करतात व दूध विक्रीही करतात त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे. इंदापूर तालुक्यातील सोनाई दूध संघाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आक्षेप घेतला होता.हा खासगी दूध संघ शेतकऱ्यांकडून लिटरला 17 रुपये दूध घेऊन त्याची भुकटी करून विकतो व सरकारचे अनुदान लाटतो, असे संघटनेचे म्हणणे होते व त्यात नक्कीच तथ्य होते म्हणून तोडगा काढताना संघटनेने मांडलेल्या मुद्द्याला सरकारने महत्त्व दिले व तसा निर्णय घेतला. त्यामुळे स्वस्तात दूध घेऊन पावडर करणाऱ्या संघांना चांगलाच चाप लागणार आहे.
Home Uncategorized जत | तालुक्यातील दुध संकलन पुर्वरत, पुन्हा डेअऱ्या खोलल्या: दरवाढीने शेतकऱ्यांचे चेहरे...