सोन्याळ | पोलिस पाटील पद 38 वर्षांपासून रिक्त |

0
1

सोन्याळ,वार्ताहर:सलग तीन वेळा सोन्याळ (ता.जत) येथील पोलिस पाटील पद अनुसुचित जमातीसाठी आरक्षित पडले आहे.या आरक्षणाचा उमेदवार मिळाला नसल्याने तब्बल 38 वर्षांपासून येथील पद रिक्त आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुशीला होनमोरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आरक्षण बदलाची मागणी केली,पण तरीही जिल्हा प्रशासन हलले नाही. त्यामुळे आता त्यांनी यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पोलिस पाटील हा संबंधित पोलिस ठाणे आणि गाव यांच्याशी जोडण्यासाठी दुव्याचे काम करतो. गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या पोलिस पाटलाचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र शासकीय काही तांत्रिक अडचणीमुळे राज्यात अनेक गावांना पोलिस पाटील नाही. असाच प्रकार जत तालुक्यातील सोन्याळ गावचा आहे. सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पोलिस पाटील नसल्याने अनेक कामांमध्ये अडचणी उभ्या आहेत. वास्तविक ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तंटामुक्त अभियान गावपातळीवर राबवण्यात येते. गावातील वादांवर नियंत्रण मिळवणे,सार्वजनिक उत्सव एकोप्याने साजरे करणे आदी उपक्रम राबवले जातात. अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय पातळीवर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तंटामुक्त गाव समित्यांच्या कामात पोलिस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक म्हणून पोलिस पाटील काम पाहात असतात,मात्र इथे हे पद रिक्त असल्याने तंटामुक्त गावसमितीची कामे खोळंबली आहेत.
1980 पासून सोन्याळला पोलिस पाटील पद रिक्त आहे. हे पद अनुसुचित जमातीसाठी आजतागायत आरक्षित आहे. गावात या समाजाची एक-दोन कुटुंबे पारधी समाजाची आहेत.मात्र ही कुटुंबे निरक्षर व  पोटापाण्यासाठी वर्ष-वर्षभर बाहेरच असतात. शिवाय या पदासाठी अर्ज करताना जातीच्या दाखल्याची व दाखल्याच्या पडताळणीची आवश्यकता असते. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असायला हवा, अशा काही अटी आहेत.यामुळे या जागेसाठी सक्षम व पात्र उमेदवारच मिळत नसल्याने तब्बल 38 वर्षांपासून हे पद रिक्त आहे. येथील माजी जि.प.सदस्या श्रीमती सुशीला होनमोरे यांनी याबाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र प्रशासन हलायचे नाव घेत नाही. आरक्षण उठवल्याखेरीज या ठिकाणी पोलिस पाटील पदाची भरती होणे शक्य नाही.मात्र प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तब्बल तीन वेळा अनुसुचित जमातीसाठी याठिकाणी आरक्षण पडले आहे. कोणत्या गोष्टीच्या आधारावर आरक्षण पडत आहे, याचे उत्तरही प्रशासनाकडे नाही.
याबाबत श्रीमती होनमोरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला असून त्यांचे उत्तर येते,याची प्रतीक्षा आहे. हा प्रश्‍न लवकर निकाली काढून पोलिस पाटील पद न भरल्यास आंदोलन छेडू, असा इशारा श्रीमती होनमोरे यांनी दिला आहे.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here