जत,प्रतिनिधी : जतसह राज्यातील इतर दुष्काळी तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने या दुष्काळी तालुक्यांना राज्याच्या अर्थसंकल्पात व जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपावेळी निर्देशांकाचा विचार करून निधी वाटप व्हावे, तसेच तालुक्यात असणारी रिक्त पदे त्वरीत भरावीत अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत केली.
आ.जगताप म्हणाले, महाराष्ट्रात असणाऱ्या दुष्काळी तालुक्यात जतचाही समावेश आहे. या तालुक्याचा मानव विकास निर्देशांक इतर तालुक्याच्या मानाने कमी आहे. इतर तालुक्याचा निर्देशांक 7 आहे तर जतचा 3 आहे. निधी वाटप होत असताना इतर तालुक्याप्रमाणेच या तालुक्याला गणले जाते. त्यामुळे निधी कमी कमी पडतो. परिणामी हे तालुके विकासापासून अनेक वर्षापासून वंचित राहत आहेत. वास्तविक निधी वाटप करत असताना मानव विकास निर्देशांकाचा विचार करावा असे कोणतेही शासकीय निर्देश नाहीत. तरीही हे होत आहे. निर्देशांकाचा विचार होत असताना कमी निर्देशंकाच्या तालुक्याना जास्त निधी मिळावा या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात व जिल्हा नियोजनात निधी वाटप करीत असताना वेगळा विचार व्हावा, जेणेकरून जतसह राज्यातील इतर दुष्काळी तालुके विकासाच्या प्रवाहात आले पाहिजेत.
आ.जगताप म्हणाले, जत तालुक्यात अनेक रिक्त पदे आहेत. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या रिक्त पदामुळे विकास खुंटला आहे. तालुक्यात पोलीस उपविभागीय अधिकारी, महसूल उपविभागीय अधीकारी (प्रांत), तहसीलदार जत, अतिरिक्त तहसीलदार संख, गटविकास अधिकारी पंचायत समिती जत, मुख्यकार्यकारी अधिकारी नगरिषद जत अशा महत्वाच्या पदावर अधिकारी नसल्याने कामकाज ठप्प आहे. या बरोबरच तालुक्यातील 18 प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे. रिक्त पदावर अधिकाऱ्याची व शिक्षकांची पदे त्वरित भरावीत.असे निवेदन विधानसभा अध्यक्षा आमदार विलासराव जगताप यांनी केले.



