जत | साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी |

0

जत,प्रतिनिधी : हवामान व ऋतूबदलाच्या परिणामांमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून, शहरात विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी-पडसे, अंगदुखी, ताप यांसारख्या आजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.  शहरातील गावठाण भागासह नव्याने उदयास आलेल्या परिसरातही रुग्णसंख्या वाढत आहे. संभाजी चौक परिसर,विठ्ठल नगर,गावभाग,पत्रकार नगरसह परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चिकुनगुनियासदृश आजारानेही डोके वर काढले आहे. याबरोबरच विषाणूजन्य ताप, सर्दी-खोकला, उलट्या, अतिसार, सांधेदुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागापुढे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ऋतूबदलामुळे बिघडलेल्या हवामानाचे मोठे आव्हान आहे. विषाणूजन्य साथीच्या आजारांना पायबंद घालण्यासाठी आरोग्य विभागाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहे.  हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता डॉक्टरांनी सकस व पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. आहारामध्ये फळांचा समावेश करण्यावर भर द्यावा. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ढगाळ हवामान तर कधी सूर्यप्रकाश अशा वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांत वाढ झाली आहे. जुलै महिना उजाडला असून पावसाला अद्याप पाहिजे तशी सुरुवात होत नसल्याने सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. शुद्ध स्वरूपाचे पाणी पिण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा. रुग्णांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. सर्दी-खोकला, तापाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात येणार नाही, याची नागरिकांनी खबरदारी घेत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

Rate Card

दंश लहान, धोका मोठा
‘क्युलेक्स’, ‘अ‍ॅनॅफिलिस’, ‘एडिस’ या डासांची उत्पत्ती विविध आजारांना निमंत्रण देणारी ठरते. डासांचा दंश जरी लहान असला तरी आजाराचा धोका मात्र मोठा असतो, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अ‍ॅनाफिलिस डासामुळे हिवतापाचा (मलेरिया) प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. एडिस डासाच्या प्रादुर्भावामुळे चिकुनगुणिया या आजाराचा प्रसार होतो. या डासाची उत्पत्तीही स्वच्छ पाणीसाठ्यात होते. क्युलेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. शौचालयाच्या सेफ्टिक टाकी, तुंबलेल्या गटारी, सांडपाण्याचे डबके, नाले यांसारख्य अस्वच्छ पाण्यात या डासांची पैदास होते.आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीला आळा घालावा.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.