दुषित पाणी,अस्वच्छेने आजार वाढले : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
जत,प्रतिनिधी : जत शहरातील सहा जणांना चिकन गुण्याची लागण झाल्याचे समोर आल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील आंबेडकर नगर, पारधी वसाहत आदींसह परिसरात व्हायरल इन्फेक्शन मुळे गेल्या आठवड्यापासून सत्तरावर रूग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यांच्या प्रकृत्ती सुधारत असतानाच सोमवारी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्रात उपाध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह सहा जणांना चिकुन गुण्याची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबंळ उडाली आहे.कांबळे सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
संजय कांबळे, भागीरथी कांबळे, निलाबाई कांबळे, नेहा कांबळे, श्रृती कांबळे,दरिकांत ऊर्फ भैय्या कांबळे अशी रूग्णांची नावे आहेत.
सतत ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, उलट्या आदी आजाराचा त्रास होऊ लागल्याने कांबळे कुटुंबातील सदस्यांना जत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाचे प्रमाण कमी होत नसल्याने रक्त, लघवीच्या तपासणी केली. त्यामध्ये चिकुन गुण्याची लक्षणे आढळून आल्याचे समजते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून याबाबत संजय कांबळे यांनी तालुका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व पालिका आरोग्याच्या बाबतीत गंभीर नसल्याने आजाराने डोके वर काढल्याचा आरोप केला आहे. सध्या शहराला होणार दुषित पाणी पुरवठा,घाणीचे साम्राज्य आजाराला बंळ देत आहे.नगरपालिका प्रशासनाच्या ढिलाईने नागरिक भयभीत झाल्याचेही कांबळे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून आरोग्य विभागाचे विशेष पथक नेमून आंबेडकर नगर व पारधी वसाहत परिसरात उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यापासून व्हायरल आजाराने अनेक रुग्ण आजाराचे बळी पडले आहेत.पालिका प्रशासनाच्या तुटपुज्या उपाययोजना साथीचे आजार आटोक्यात आणू शकत नसल्याचे चित्र आहे.





