जत | ऑनलाईन सातबाराचे अडथळे संपेनात | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:डिजिटल स्वाक्षरीसह  7/12 उतारा  ऑनलाईन देण्याचे शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. तरीही सातबारा ऑनलाईनचा गोंधळ संपेल असे दिसत नाही.
शासन स्तरावरून वरिष्ठ अधिकार्‍यांवर काम लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव आहे. त्यामुळे अधिकारी तलाठ्यांच्या मागे लागले आहेत. परिणामी तलाठ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. ऑनलाईनच्या कामामुळे हजारो नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
सातबारा उतारा ऑनलाईन करण्याची मोहीम राज्य शासनाच्यावतीने सुरू आहे. प्रत्यक्षात सन 2004 पासूनच महसूल खाते जमिनी संदर्भात लागणारे दस्तावेज ऑनलाईन करण्याचे प्रयत्न करीत आहे. सन 2004-05 मध्ये एनआयसीने जो नमुना (फॉरमॅट) करून दिला होता त्यानुसार त्यावेळी ऑनलाईन सातबारा भरण्यात आले.परंतु त्या सातबारा उतार्‍यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या. आता सातबारा उतारे ऑनलाईन करण्यात आले आहेत,  पण त्यातील त्रुटींचा घोळ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.सातबारा ऑनलाईन करण्याच्या धावपळीत इतर हजारो नोंदी रखडल्या आहेत. यामध्ये खरेदी दस्त, बोजा चढवणे, विहीर, कूपनलिका यासारख्या हजारो नोंदी रखडल्या आहेत. या नोंदी घालण्यासाठी तलाठ्यांकडून तारखा दिल्या जात आहेत. मात्र सात बारा ऑनलाईनच्या कामाचाच भार पेलवत नसल्याने तलाठीही त्रस्त झाले आहेत.  शेतकरीही तलाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे घालून मेटाकुटीला आले आहेत.सातबारा उतारा ऑनलाईन करण्यासाठी  तलाठ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. शासनाकडून अशा प्रकारे योग्य प्रशिक्षण दिले गेले नसल्याने मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.