जत,(प्रतिनिधी):जत- उमदी,उमदी-विजापूर महामार्गासह अनेक ठिकाणी मार्गांवर साइड पट्टय़ांची कमतरता जाणवत असून, त्यामुळे अनेक लहान-मोठय़ा अपघातांना निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन तातडीने साइड पट्टय़ांची कामे करणे गरजेचे आहे.
जत तालुक्यात रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे. साईडपट्ट्या खचल्या आहेत. डांबरी रस्ते उखडले आहेत. मोठमोठे खड्डे रस्त्याच्या मधोमध पडले आहेत. यामुळे साहजिकच अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गुहागर-जत-विजापूर हा राज्य मार्ग आता राष्ट्रिय मार्ग झाला आहे. मात्र हा रस्ता महामार्ग म्हणण्याच्या लायकीचा नाही. जागोजागी खड्डे, चढउतार, साईड पट्ट्या खचलेल्या अशी अवस्था झाली आहे. जत अथणी , जत-उमदी , जत-सांगोला, जत-मंगलवेढा या रस्त्यांची अत्यंत वाऎट अवस्था झाली आहे. रस्त्यांवर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, साइड पट्टय़ांअभावी वाहनचालकांना अडचणी येत आहेत. अनेकवेळा अपघात होत असून, काही वेळा रस्त्याच्या खाली गाडी उतरविण्यावरून वाहनचालकांत भांडणेही होत आहेत, तर अनेकवेळा मोठी वाहने वेगाने जात असताना, दुचाकीस्वारांना रस्त्यांच्या खाली गाड्या उतरविताना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
जत तालुक्यातील महामार्गाच्या साईटपट्टयाची अशी आवस्था वाहन धारकाची जिवघेणी ठरत आहे.





