जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीमधील मनरेगाच्या बोगस कामांची बिले दबाब टाकून काढण्याचा प्रयत्न आ.विलासराव जगताप करित आहेत. कोणतीही बिले चौकशी न करता दिल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिंदे म्हणाले,पंचायत समितीत मनरेगाच्या कामात भष्ट्र टोळीने मोठा घोटाळा केला आहे.यांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी आम्ही यापुर्वीच केली आहे. घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचारी जेलमध्ये गेले आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. त्यात शेतकरी बाजूला राहिला असून ठेकेदारांनी कोट्यावधीचा निधी ढापला आहे. 53 कोटीची कामे झाल्याचे दाखविले आहेत. प्रत्यक्षात दहा ते बारा कोटीची कामे झाली आहेत. त्यामुळे मोठा घपला झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
घोटाळ्यात आमदाराचे बगलबच्चे ठेकेदार आहेत. त्यांची बोगस कामाची बिले थकली आहेत. त्यातील सुमारे 7.53 कोटीची बिले काढण्याचा घाट घातला आहे. यातील अनेक कामे बोगस असण्याची शक्यता आहे. आमदार जगताप यांनी आपले वजन वापरून संबधित मंञ्याकडून पत्र आणून बिले काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र यातील अनेक कामे बोगस आहेत.त्यामुळे चौकशीशिवाय कोणतीही बिले काढू नयेत अन्यथा तीव्र अंदोलन करू असा इशारा शिंदे यांनी दिला.
उपसभापती शिवाजीराव शिंदे म्हणाले, पंचायत समितीला नियमित बिडिओ असताना त्यांना रजेवर पाठवून एका भ्रष्ट अधिकाऱ्यांला आणून बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे.यातील बिले सर्वाधिक ठेकेदारांची आहेत. ही बोगस बिले काढली तर आपण स्वतः पंचायत समितीसमोर उपोषण करू,असा इशारा त्यांनी दिला.




