जत परिसरात वाढतोय बालगुन्हेगारीचा आलेख
बालवयातच सुसंस्कारांची गरज : पाकिटमारी, मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या, समाजाचे मात्र दुर्लक्ष
जत,(प्रतिनिधी) – शहरात सध्या बाल गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल, कोंबड्या,वीज मोटर, पाकिटमारी, मोबाइल, दुचाकी, सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. आठवडी बाजाराच्यादिवशी तर घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.
अलिकडच्या काही वर्षात अल्पवयीन मुले हॉटेल,पोल्ट्री दुकाने,किराणा दुकाने, लोखंडी साहित्य,गॅरेज अशा दुकानांमध्ये शिरून साहित्य,वस्तू,किराणा माल,हॉटेलमधला माल चोरत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यामधील काही बालगुन्हेगारांना ताकीद देवून सोडण्यात येते. तर काहींवर गुन्हा नोंद करण्यात येतो. ही मुले 10 ते 15 वर्षे वयोगटील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी समाजप्रबोधन करण्याची गरज आहे.
आई-वडिलांकडून मुलांच्याबाबतीत चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवली जाते. त्यांच्याविषयी चांगली स्वप्ने पाहिली जातात,मात्र मुले मात्र चोर्या करत असल्याने त्यांची स्व्प्नए धुळीस मिळत आहेत. मात्र काही पालकांचा पाल्यांना पाठिंबा असल्याचेही दिसून येत आहे.यामुळे उद्या पालकांनाच त्याचा त्रास होणार आहे,याची जाणीव त्यांना करून देण्याची आवश्यकता आहे.तर काही पालक मुलांच्या कडून चांगली स्वप्ने पाहिली गेली असताना त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे पालक हाताश झाले आहेत. एक वेळ पोटाला चिमटा देवून मुलांना शिक्षण देण्यासाठी पालक झटत आहेत. मात्र काही वाईट प्रवृत्तीच्या सोबतीमुळे चांगल्या मुलांची वाताहत होताना दिसत आहे. हे थांबण्यासाठी मुलांचे योग्य प्रबोधन होणे गरजेचे आहे.पालनपोषण करताना स्वत: कुठे चूक करत आहोत का? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ काही पालकांवर आली आहे. बाल गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी व समाजसुधारक व्यक्तींनी या भागात पुन्हा बाल गुन्हेगारी वाढणार नाही, यासाठी समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे. चोर्या करून मिळणार्या पैशातून तात्पुरती मजा मुलांना मिळेल. मात्र एखादे व्यसन त्यांना लागले तर मात्र, त्यांची मजल मोठी गुन्हेगारी करण्याकडे वळेल. त्या अगोदरच अशा मुलांवर चांगले संस्कार करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, खेळण्या-बागडण्याच्या वयातच ही मुले गुन्हेगारीकडे आकृष्ट होत असल्याने त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.





