जत, प्रतिनिधी:दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटिल होत असून, त्यात बेशिस्त वाहनांची भर पडत आहे. आधीच शहरात पार्किंगची समस्या वाढत असताना त्यात मुख्य रस्त्यांवर दिवसभर उभ्या राहणार्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. शहरातील विविध भागांत हेच चित्र असून, वाहतूक पोलिस मात्र याकडे काणाडोळा करीत आहेत. बेशिस्त वाहनांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. शहरात हजारो नोकरदार नोकरीनिमित्त या मार्गावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे दुचाकी व चारचाकींसह अनेक वाहनांची वर्दळ असते; परंतु बेशिस्तपणे रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते व कामाच्या ठिकाणी पोचण्यास उशीर होतो, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. शहरातील अनेक भागात हीच परिस्थिती असून, या उभ्या वाहनांमुळे आता गल्लीबोळातही वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी महिनोंन्महिने ट्रक; तसेच अवजड व छोटी वाहने वापराविना तशीच पडून आहेत. या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. विजापुर-गुहागर,मंगळवार पेठ,बिंळूर चौक परिसरातही दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे. परिसरात वाहनधारकांची संख्या वाढतच असून, अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे येथेही वाहतूक विस्कळीत होत आहे. वेळेअभावी वाहनधारक जागा सापडेल तिथे वाहने उभी करून निघून जात असल्याने, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बसस्थानकांसमोरील रस्ता; तसेच थांब्याशेजारील रस्त्यावरही रिक्षावाले; तसेच ट्रक,लहान वाहने यांचा कब्जा असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे; परंतु याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
हप्तेबाजीमुळे वडाप वाहनांना रस्त्यावर कोठेही वाहने लावण्यास भुभा
जत शहरातून स्टँडसमोर,महाराणा प्रताप चौक,बिंळूर चौक,बनाळी चौक,मार्केट यार्ड परिसर,निगडी चौकात वडाप गाड्याने पुर्ण रस्ता व्यापलेला असतो.थेट वडापची वाहने रस्त्यावर उभी करून भरली जातात.अनेक वेळा वडाप वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने किलोमीटर पर्यत वाहतूक जाम होत,दिवसभरात अनेक वेळा असा प्रकार घडत असताना पोलिस या वडाप गाड्यांना कधीही वाहतूकीची शिस्त लावताना दिसत नाही.त्यामागचे कारणही नाजूक आहे. हप्ते बाजीने त्यांना उभय दिले जात असल्याचे आरोप होत आहेत.
जत: विजापुर-गुहागर मार्गावर नित्यांने अशी धोकादायक वाहतूक सुरू असते.






