…आता जत शहराच्या विकास आणि सुधारणांकडे लक्ष द्या

0

जत,(प्रतिनिधी);

जत नगरपालिकेची निवडणूक झाली. त्रिशंकू अवस्था झालेल्या पालिकेत विकासाच्या नावाखाली कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येत सत्तेवर आले आहेत. निवडणूक काळात एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर घसरणारे दोन्ही पक्षांचे नेते हातात घालून जत शहराचा कारभार चालवण्यासाठी एकत्र आले असले तरी त्यांची मने कितपत जुळली आहेत, हे सांगणे अवघड असले तरी त्यांनी राजकारण न करता जत शहराचा विकास साधावा, अशी जतवासियांची इच्छा आहे.

जत शहराला नगरपालिका मिळून पाच वर्षे उलटून गेली,परंतु कारभार मात्र अजून ग्रामपंचायतीचा असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. जत शहरातील रस्ते,गटारी,वीज, कचरा उचलण्याची यंत्रणा असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शहरातल्या काही भागात रस्त्यांची कामे झाली, पण आज त्यांची अवस्था पाहिली तर फारच भयंकर आहे. पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी रस्त्यांची अवस्था झाली आहे. गटारींची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही.    गटारींची मोठ्या प्रमाणात कामे होण्याची आवश्यकता आहे. मुख्य बाजारपेठेत भुयारी गटारीची गरज आहे.

जत शहर तालुक्याचे ठिकाण आहे. इथे रोज आणि आठवडी बाजारांच्या दिवशी तालुक्यातल्या लोकांची गर्दी असते. यात महिलांचा समावेश अधिक आहे, मात्र त्यांच्या सोयीसाठी शहरात कुठेच स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. शहरात शौचालयांची अजून मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे,याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Rate Card

सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आठवडे भाजीपाला बाजाराचा! शहरात मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी भाजीपाला बाजार भरतो. मात्र यासाठी खास अशी व्यवस्था करण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे हा बाजार संपूर्ण शहरभर भरतो. याचा परिणाम शहरातल्या वाहतुकीवर होतो. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपले हात साफ करत आहेत. कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस संचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप त्याला मुहूर्त सापडला नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. काही उत्साही राजकारणी लोकांनी आपण अमुक इतके सीसीटीव्ही कॅमेरे देऊ,असे आश्वासन दिले आहे,त्यांनी आता आपला शब्द खरा करायला हवा आहे.

शहरात भाजी मंडई उभारण्यात आली आहे,पण तिथे विक्रेते बसायला तयार नाहीत. सध्या हा बाजार शहरभर भरत आहे.त्यामुळे शहराला अवकळा आली आहे. भाजी मंडईचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. मटण,चिकन,मासे,झिंगे यांची विक्री उघड्यावर केली जात आहे. यासाठी मटण मार्केटची आवश्यकता आहे,पण याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सत्तेवर आलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तरी हे प्रश्न सोडवणार  आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात सर्वांसाठी उपयुक्त बगीचा नाही. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हॉल नाही. लोकांना वाचण्याची सवय लावण्यासाठी काही प्रयत्न होत नाहीत. स्टेडियमचा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही,त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध नाही. लोक फिरायला आणि व्यायामाला रस्त्यावरच जातात. जीविताच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. फिरायला गेलेल्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पालिका यासाठी काहीही पावले उचलायला तयार नाही. जत शहरात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनी मंजूर आहे,पण तेही काम पूर्ण झालेले नाही. या विकास आणि सुधारणांकडे आता सत्ताधारी मंडळींनी लक्ष देण्याची गरज असून जनतेचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवण्यासाठी कामाला लागण्याची गरज आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.