विरोधकांच्या दबावामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देत आहे,दिले आहे,असे सरकारला जाहीर करणे भाग पडले; माजी मंत्री आ.जयंतराव पाटील

0

इस्लामपूर,प्रतिनिधी ;

      राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देणे,31 मार्च 2018 पर्यंत लांबविले असते. मात्र हल्लाबोल आंदोलन व आम्हा विरोधकांच्या दबावामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देत आहे,दिले आहे,असे सरकारला जाहीर करणे भाग पडले,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व जेष्ठ नेते नारायण राणे यांच्याबरोबर “डबल गेम” खेळत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपास पाठिंबा व्यक्त करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. हे घोषणा बाज सरकार आहे. अनेक प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांनी या प्रश्नांना बगल दिली आहे. अनेक मंत्री अधिवेशन कामकाजा बाबत गंभीर नव्हते,अशी खंत ही व्यक्त त्यांनी केली.

       आ.पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ ते नागपूर या 12 दिवसाच्या पायी हल्लाबोल आंदोलनात आघाडीवर होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात त्यांनी बोण्ड अळी, शेतकऱ्यांची कर्जमाफी,कायदा व सुव्यवस्था,भ्रष्टाचार आदी मुद्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला,असता त्यांनी विविध मुद्यावर आपली मते व्यक्त केली.

          आ.पाटील म्हणाले,विदर्भातील शेतकऱ्यांचे कापसावरील बोण्ड अळी,आणि धानावरील तुडतुड्या रोगाने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना  मदत करण्याची सरकारची मानसिकता नव्हती. मात्र हल्लाबोल आंदोलन,व विरोधकांच्या दणक्याने सरकारला बियाणे कंपन्या,विमा कंपनी,व केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना भरपाई देवू,असे अशी घोषणा करावी लागली. अर्थात ही घोषणा फसवी आहे. यामधून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल असे वाटत नाही. 

मुख्यमंत्र्यांचा डबल गेम!

           राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व जेष्ठ नेते नारायण राणे यांच्याशी “डबल गेम” खेळत आहेत. ते शिवसेनेला सांगतात,त्यांना मंत्री मंडळात घेणार नाही.आणि राणेंना सांगतात, लवकरच मंत्री मंडळ प्रवेश करू. आता नक्की काय करतात ते बघू. मात्र त्यांनी राणेंना प्रवेश दिल्यानंतरही जर,शिवसेना सत्तेत राहिली,तर मग शिवसेनेचे चांगलेच घोंगडे अडकले आहे,असे म्हणावे लागेल,असेही त्यांनी सांगितले.

खा.पवार व राष्ट्रवादीच्या भूमिकेचे समर्थन।

          या अधिवेशनात शिवसेना अगदी तटस्थ होती. त्यांना फार विश्वासात घेवून  भाजपा काम करीत आहेत,असे दिसत नाही. तरीही ही मंडळी सत्तेत का राहिली आहेत?असा प्रश्न आ.पाटील यांनी केला. तेव्हा एका पत्रकारांनी आपण सत्ता स्थापने वेळीच पाठींबा व्यक्त केला असल्याचे सांगितले. आ.पाटील म्हणाले,पक्षाची ती भूमिका योग्यच होती. त्यामुळे या दोन्ही सत्ताधारी पक्षात साडे तीन वर्षे उलटूनही विश्वास दृढ होवू शकलेला नाही,असे ते म्हणाले.

पायी हल्लाबोल आंदोलन व फोडाचे मार्केटिंग-

         आपल्या 12 दिवसाच्या पायी हल्लाबोल आंदोलनातील अनुभव सांगताना आ.पाटील म्हणाले,एक वेगळा अनुभव होता. विदर्भात भयानक परिस्थिती आहे. आम्हाला ती पाहता आली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेता आल्या. दररोज साधारण कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 23 किलोमीटर असे एकूण 153 किलोमीटर चाललो. दररोज 800- 1500 कार्यकर्ते,शेतकरी यामध्ये सहभागी झाले. आम्हास चांगला प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवशी नागपूर येथे राष्ट्रवादी,काँग्रेस यांच्यासह शेकाप,आरपीआय (कवाडे गट),समाजवादी आदी विरोधी पक्षांची मोठी जाहीर सभा झाली. या दौऱ्यात चालताना माझ्या पायाला फोड आले होते,असे त्यांनी सांगताच काही पत्रकार,”या फोडांचे फोटो सोशल मीडियावर टाकून मार्केटिंग करायला हवे होते,असे म्हणाले. यावर “असले मार्केटिंग”आम्हाला जमत नाही,असे त्यांना म्हणताच एकच हशा झाला. 

गुजरात विधान सभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रात काय होवू शकते? 

           जर लाट नसेल,तर भाजपा साम,दाम,भेद आदी सर्व मार्गांचा वापर करून काठावर का होईना कशी निवडणूक जिकतात?हे संपूर्ण  भारताने या निवडणुकीत पाहिले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आले,व त्यांनी समविचारी पक्षाना बरोबर घेतले,तर राज्यात भाजपाचे सरकार पायउतार होवू शकते. हे फक्त घोषणाबाज सरकार आहे. दररोज नवं-नव्या घोषणा करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही,अशी भावना सामान्य जनतेत झाली असून दिवसेंदिवस या सरकारच्या विरोधी जनतेत असंतोष वाढतच आहे. तो 2019 पर्यंत अगदी टोकाला जावू शकतो. 

खा.राजू शेट्टींशी आघाडी करणार काय? 

          या प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले,तशी भेट,चर्चा झालेली नाही. भाजपाने निवडणुकीत देशातील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत,त्यांनी फसवणूक केली आहे,अशी त्यांची भावना झाली आहे. ते सद्या भाजपा सरकारच्या विरोधी काम करीत आहेत,एवढं माहीत आहे. आ.शिवाजीराव नाईक यांना मंत्री पद मिळणार काय? यावर त्यांनी मला कसे माहीत असणार? असा प्रति सवाल केला. यावेळी त्यांनी साखर उद्योगाबद्दल चिंता व्यक्त जीएसटी,देशाचा विकास दर,पोलीस खात्याचा कारभार आदी मुद्यावर भाष्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.