डफळापूर,वार्ताहर : डफळापूर परिसरातील महावितरण कंपनीकडून थकीत विजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना छळण्याचे प्रकार सुरू आहेत. वसुली थकल्याच्या नावाखाली पुर्ण डिपीचा विजपुरवठा बंद केला जात आहे. हा शेतकऱ्यांवर पुर्णत: अन्याय आहे. महावितरणने हा प्रकार थांबवावा अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेेक बघावा लागेल असा इशारा माजी सभापती मन्सूर खतीब यांनी दिला. खतीब पुुढे म्हणाले,दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना चालू वर्षी मान्सून रिटर्न पावसाने चांगली साथ दिल्याने यावर्षी रब्बीची पिके चांगली आली आहे.पिके सध्यस्थितीत
हातातोंडाला आली असताना विज पुरवठा तोडल्याने पिके धोक्यात आली आहेत.गत चार वर्षात शेतकऱ्यांची पिके नसतानाही महावितरणने आवाच्या सव्वा बिले दिली आहेत. त्यांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून मोहीम राबविली जात आहे. त्यात ज्या डिपीची शंभर टक्के वसुली नाही. त्या डिपीचा विज पुरवठा थांबविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षापासून शेती पिकली नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यात यंदा पिके चांगली आहेत. पाणीही आहे. मात्र थकीत वसुलीच्या नावाखाली विज पुरवठा बंद केला जात असल्याने पाणी पाजायचे कसे असा प्रश्न उभा टाकला आहे. प्रत्यक्षात बेहिशोबी बिले,त्यात ऐन पिके येण्याच्या स्थितीत असताना विज पुरवठा खंडित करून महावितरणच्या डफळापूर विभागाकडून अन्याय केला जात आहे. पिके पुर्ण येईपर्यत कोणत्याही परिस्थितीत विज पुरवठा खंडित करू नये अन्यथा तीव्र अंदोलन पुकारू असा इशारा खतीब यांनी शेवटी दिला.





