मनरेगा घोटाळा पुन्हा चौकशी जत पंचायत समिती : आठ कोटी कामातही तक्रारी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मनरेगा घोटाळा संपण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे. समोर आलेली बोगस कामे वगळता तालुक्यातील अन्य सुमारे आठ कोटी रुपयाच्या कामाची बिले देण्याची मागणी होत आहे. त्यातही पन्नास टक्के कामे बोगस असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व कामाची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी चार पथके तयार करून गावा गावत जाऊन कामे,कागदपत्रे, रोजगार सेवक व ग्रामपंचायतीकडची कागदपत्रे तपासत आहेत.तालुक्यातील बाज व रामपूरसह अनेक गावातील कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मनरेगा योजनेची काही स्वयं घोषित नेते,अधिकाऱ्यांनी वाट लावली. राज्यभर घोटाळा गाजला त्याप्रकरणी संशयित अधिकाऱ्यांसह चौदा जणावर फौजदारी कारवाई सुरू आहे.यामुळे तालुक्यातील मनरेगाची दहा महिन्यापासून कामे बंद आहेत.मंजूर शेतकऱ्यांसह कुशल कामाची आठ कोटीची बिले थकीत आहेत.
थकीत बिले द्यावीत यासाठी अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. या वादातून काही महिन्यापुर्वी एक अधिकारी रजेवर गेले आहेत.सध्या तासगावचे गटविकास अधिकारी अरूण जाधव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे.थकीत बिले द्यावीत अन्यथा पंचायत समितीस टाळे ठोकू असा इशारा पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.त्यामुळे बिले देण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बिले देण़्याआधी संपुर्ण कामाची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार पथके नेमण्यात आली आहेत.त्यांच्या कडून वैयक्तिक लाभार्थ्याच्या कामाची तपासणी करण्यात येत आहे. कुशल कामाची स्वत: गटविकास अधिकारी यांनी तपासणी केली आहे.
बाजमध्ये मनरेगा मधील 56 लाख रुपयांच्या कामात अनियमितता आढळली होती. त्यात दोन ग्रामसेविकांना निंलबितही करण्यात आले आहे. रामपूर मधील मनरेगा कामाच्या चौकशीसाठी गावकऱ्यांनी अंदोलन केले होते. वनीकरणासह मातीबांध,कुशल कामेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत.तिकोंडी ,करेवाडी(ति.),कागनरी,कारजनगी,
खैराव,माडग्याळ मधील कामाच्या चौकशीची मागणी होत आहे.
दरम्यान गटविकास अधिकारी जाधव म्हणाले,कोणत्याही कामाचे चौकशी शिवाय बिल देणार नाही.संपुर्ण कागदपत्राची पुर्तता असेलतर कामे प्रत्यक्ष पाहिले जाणार आहे. त्यासाठी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. काही बोगस कामे दाखविले जाण्याची शक्यता आहे.त्यांच्यावर कारवाई होईल.
