कसबे डिग्रज,वार्ताहर:
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून सहा महिने झाले,तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या हातात कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत. राज्य सरकारने येत्या महिन्याभरात राज्यातील शेतकऱ्यांच्या हातात कर्जमाफीचे पैसे दिले नाहीत,तर 11 डिसेंबरला सुरू होणारे राज्य अधिवेशन चालू देणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान सभेतील गटनेते,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी कसबे डिग्रज येथील जाहीर सभेत बोलताना दिला. नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयाने समाजात भाजपा विरोधी लाट निर्माण झाली आहे. ही लाट कमी करण्याबरोबर गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने जीएसटी तील काही कर कमी केले,असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कसबे डिग्रजच्या लोकनियुक्त नूतन सरपंच सौ.किरण कुमार लोंढे,उपसरपंच प्रमोद चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा आ.पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. जेष्ठ नेते आनंदराव नलवडे,पंचायत समिती सदस्य अजय चव्हाण,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख,माजी सरपंच आण्णासाहेब सायमोते,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,युवकचे प्रदेश उपाध्यक्ष पै.ताजुद्दीन तांबोळी,माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी युवा कार्यकर्ते राहुल जाधव व प्रभाग क्र 3 मधील कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यस्तरीय स्पर्धे तील विजेता कु.रत्नदीप सोमनाथ डवरे याचा गौरव करण्यात आला.
आ.पाटील म्हणाले,आपणा सर्वांच्या एकसंघ ताकदीतुन हे यश मिळालेले आहे. आता कोण कुठे गेला,कोणी मतदान दिले,नाही दिले ,हे सर्व विसरा. सर्वाना बरोबर घेवून गावाच्या विकासाला अधिक गती द्या. आपण मतदारांना दिलेल्या आश्वासनाची यादी करून ती प्राध्यान्य क्रमाने पूर्ण करण्यावर भर द्या. तुमच्या या संकल्पपूर्तीत मी आपल्या बरोबर आहे. ग्रामपंचायतीने खाण कामाचा आराखडा तयार करावा. काम मोठे आहे. टप्प्या-टप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पिण्याच्या पाण्याची योजना व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामास गती देण्यात येईल.केंद्र शासनाच्या नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयाने सामन्य माणूस,शेतकरी,व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. नोटबंदी ने काळा पैसा बाहेर काढण्याबरोबर आतंकवादी, नक्षलवादयांचे कंबरडे मोडू असे सांगत होते. त्यातील काय झाले?
यावेळी पंचायत समिती सदस्य अजय चव्हाण यांनी क्रीडांगण,स्पर्धा परीक्षा केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,ड्रेनेज आधी कामाचा उहापोह केला. माजी सरपंच आण्णासाहेब सायमोते म्हणाले,तुम्ही पाठीशी रहा,खण मुजविण्याचे काम करून दाखवू. शेतकी शाळेतील 10 गुंठे जमीन बाजार व पुतळ्यासाठी मिळायला हवी.माजी सरपंच संगोष पिंपळे म्हणाले,मी तात्याकडून 25 लाख घेतल्याची कोणा तरी सज्जन माणसाकडे क्लिप आहे,त्याने ती दाखवावी मी गाव सोडतो, नाहीतर त्याने तरी गाव सोडावे. यावेळी विजयबापू पाटील,पै.ताजुद्दीन तांबोळी, प्रा.बाळासाहेब मासुले,सदाभाऊ कदम यांचीही भाषणे झाली. सरपंच सौ.लोंढे,उपसरपंच प्रमोद चव्हाण यांनी सत्कारास उत्तर दिले.
युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी प.स.सदस्य रामचंद्र लाड,उद्योजक रामभाऊ मासाळ,मोहन देशमुख,सुधीर देशमुख,कुमार लोंढे,अशोक चव्हाण यांच्यासह गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते,व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. संजय शिंदे यांनी आभार मानले. सुधीर गोंधळे यांनी सूत्र संचालन केले.
फोटो ओळी-कसबे डिग्रज येथे लोकनियुक्त नूतन सरपंच सौ.किरण लोंढे यांचा सत्कार करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत आनंदराव नलवडे,अजय चव्हाण,भरत देशमुख,आण्णासाहेब सायमोते,उपसरपंच प्रमोद चव्हाण,व मान्यवर.
आमदारपेक्षा मोठा महापौर?
सरकारला थेट सरपंच निवडणुकीत फार मोठे यश मिळाल्या सारखे वाटते. त्यामुळे ते आता काही महानगरपालिका निवडणुकीतही थेट महापौर अशी निवडणूक करणार आहेत. मात्र एवढ्या मोठया शहरात एखादा माणूस सर्वांच्या ओळखीचा असू शकतो का? मग तो आमदाराच्यापेक्षा मोठाच हवा. शासन निर्णय घेताना तारतम्याचा विचारही करीत नाही,असा टोला त्यांनी यावेळी बोलताना दिला.